कोरोनाचा धोका वाढला; यवतमाळ जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन

यवतमाळ :- राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Corona Virus) डोकं वर काढले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राजूर सरकारची चिंता वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अखेर यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊन (Corona Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह (M Devender Singh) यांनी घेतला.

यवतमाळमध्ये कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात 29 , जानेवारी महिन्यात 25 मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे.

यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढणाऱ्या तीन ठिकाणाहून प्रतिदिन प्रत्येकी 500 याप्रमाणे दिवसाला 1500 नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे, याबाबत विश्लेषण करून डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा. सोबतच खाजगी रुग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याची कारणे याबाबत ऑडीट रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. हाय -रिस्क, लो-रिस्कनुसार लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी सकाळी मुंबईत पत्रकारांशी बोलताना यवतमाळसह, अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा दिला होता. शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय राठोड, यशोमती ताई, बच्चू कडू यांच्याशी मी बोललो आहे. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर तिथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांच्या कानावर घातले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर दुपारी यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही बातमी पण वाचा : कोरोना : केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER