काही शहरात लॉकडाऊन सौम्य करण्याच्या पवारांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

CM Uddhav Thackeray & Sharad Pawar

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुरु असलेल्या कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर आज (3 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत लॉकडाऊनच्या गोंधळावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात ही बैठक पार पडली.

मुंबईसह इतर शहरांमध्ये लॉकडाऊन कडक करताना वेगवेगळे नियम लागू केल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. मंत्र्यांना विश्वासात न घेता लॉकडाऊन कडक करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्रीही नाराज आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासकिय अधिकार्यांच्या धोरणानुसार हा निर्णय घेतला. नागरीकांना २ किलोमीटरचे बंधन घातल्याचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचं काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं मत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं. सोबतच ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीमधील कडकडीत लॉकडाऊन सौम्य करण्याच्या सूचना पवारांनी ठाकरेंना दिल्याची माहिती.

या बैठकीनंतर आता लॉकडाऊनबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर सरकार चालवताना तीन पक्षात समन्वय ठेवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लॉकडाऊनबाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केली आहे. लॉकडाऊन बाबतचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी परस्पर जाहीर केल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. या विषयावर बोलण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

लॉकडाऊन कडक केल्याने याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर आणि लोकांच्या जनजीवनावर होत असल्याची भावना पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवल्याची माहिती पुढे येत आहे. केवळ प्रशासकीय अधिकारी जे सांगतात तेच योग्य नसून लोकप्रतिनिधी यांच्याकडून आलेली माहिती देखील महत्त्वाची असते आणि जनतेच्या प्रश्नांची त्यांनाच उत्तरं द्यावी लागतात. म्हणून त्यांना देखील विश्वासात घेतलं पाहिजे ही सूचना शरद पवारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आजच्या या बैठकीत राज्यपाल नियुक्त १२ जागाच्या बाबतीत देखील चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. शिवाय, राज्यात पीककर्जवाटप आणि बोगस बियाणे यावरही सरकारला काही महत्वाच्या सूचना शरद पवार यांनी केल्या असल्याचं सांगितलं जातं आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्रात मिशन बिगेन करताना, जे निर्बंध घातले होते ते ३१ जुलैपर्यंत वाढवले आहेत. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे. यापूर्वी निर्णय प्रक्रियेत आपल्याला सहभागी केलं जात नसल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही हीच भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे. आता पवार-ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीत यावर काही तोडगा निघाला का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER