बॉलिवूड लागले कामाला

Bollywood

गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे घरी बसलेले बॉलिवूड (Bollywood) आता पूर्ण जोशात कामाला लागलेले दिसत आहे. खरे तर लॉकडाऊनच्या (corona lockdown) काळातच घरबसल्याही अनेक जण काही ना काही काम करीतच होते. संगीतकार नव्या चाली तयार करीत होते तर गीतकार गाणी लिहीत होते. काही दिग्दर्शक पटकथा लेखकांबरोबर पुढील चित्रपटाची पटकथा अंतिम करीत होते. ‘परंतु हे सर्व पडद्यामागील काम होते. खरे काम शूटिंगचे असते आणि तेच सुरू होत नव्हते. मात्र लॉकडाऊन-४ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी दिली आणि बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन हे शब्द ऐकण्यास येऊ लागले आहेत.

सध्या जवळ जवळ अख्खे बॉलिवूड चित्रीकरणात व्यस्त आहे. कोविड संसर्गाची सगळी काळजी घेऊन शूटिंग करण्यात येत आहे. कोणता कलाकार कुठे शूटिंग करीत आहे त्याची माहिती खास आमच्या वाचकांसाठी. शूटिंगची परवानगी मिळताच सर्वप्रथम अक्षयकुमारने ‘बेलबॉटम’ चित्रपटाची शूटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. जॅकी भगनानी ‘निर्मित’ या चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात युनिटसह लंडनला गेले. अक्षयसोबत लारा दत्ता आणि हुमा कुरेशी या अभिनेत्रीही आहेत. शूटिंगसाठी गेलेल्या अक्षय आणि लाराचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत लंडनला गेले आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी असलेल्या संजय दत्तनेही केमोथेरेपीचे पहिले सेशन झाल्यानंतर लगेचच ‘शमशेरा’ चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटात संजय दत्तबरोबर रणबीर कपूरही आहे. चित्रपटाच्या शूटिंगसोबत संजय दत्तने आपल्या कन्नड चित्रपटाचे डबिंगही पूर्ण केले. १५ सप्टेंबरला संजय दत्त (Sanjay Dutt) पत्नी मान्यतासह दुबईला आपल्या मुलांना भेटण्यास गेला.

रणबीर कपूरनेही चित्रीकरणास परवानगी मिळताच मुंबईत जाहिरातीचे शूटिंग सुरू केले. रणबीर कपूरसोबतच सोनाली बेंद्रे आणि रवीना टंडन यांनीही जाहिरातीचे शूटिंग करण्यास सुरुवात केली आहे. शाहरुख खाननेही आपल्या मन्नत बंगल्यात जाहिरातीचे शूटिंग सुरू केले होते. दीपिका पदुकोनने गेल्या आठवड्यापासून गोव्यात शूटिंग सुरू केले आहे. शकुन बात्रा दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव अजून ठरवण्यात आलेले नाही. तर रणवीर सिंहने मुंबईत एका जाहिरातीचे शूटिंग करण्यास सुरुवात केली. ईशान खट्टर आणि अनन्या पांडे अभिनीत ‘खालीपिली’ चित्रपटाचे शूटिंग करण्यास सुरुवात झाली. मुंबईत शूटिंग झाल्यानंतर आता ‘खालीपिली’चे युनिट गोव्याला शूटिंगसाठी जाणार आहे.

तापसी पन्नू जयपूरमध्ये तामिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. अर्जुन कपूरनेही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रकुल प्रीतसिंहसह शूटिंगला सुरुवात केली होती. परंतु काही दिवसांतच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे
समोर आले आणि त्याने स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. १५ दिवसांनंतर तो पुन्हा शूटिंग करण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे. जॉन अब्राहमनेही शूटिंगला परवानगी मिळताच ‘सत्यमेव जयते-२’ च्या शूटिंगला सुरुवात केली. यासाठी जॉन संपूर्ण युनिटसह लखनौला गेला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक मिलाप झवेरी याने ऑगस्टमध्येच लखनौला जाऊन शूटिंगसाठी लोकेशन फायनल केले होते आणि आता त्याच जागांवर शूटिंग केले जात आहे. खरे तर या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग मुंबईत केले जाणार होते; परंतु मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहून लखनौला शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार स्क्रिप्टमध्येही बदल करण्यात आला आहे.अमिताभ बच्चन यांनीही केबीसीचे शूटिंग सुरू केले. अमिताभ बच्चन यांचे वय झाले असल्याने सेटवर संपूर्ण काळजी घेऊन, अमिताभ यांच्या जवळ जास्त कोणी जाऊ नये याची काळजी घेऊन शूटिंग सुरू करण्यात आले आहे.

अमिताभ आता लवकरच रणबीर कपूर आणि आलिया अभिनीत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे राहिलेले शूटिंगही पूर्ण करणार आहे. सलमान खान आता लवकरच ‘राधे’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असून भूमी पेडणेकर ‘दुर्गावती’ या हॉरर थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असून विद्या बालनही ‘शेरनी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. एकूणच कोरोनावर मात करीत बॉलिवूड आता पूर्णपणे कामाला लागल्याचेच दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER