कोरोनामुळे अमेरिकेत एका दिवसात १०४९ मृत्यू; रुग्णांचा आकडा २ लाख १५ हजारांवर

वॉशिंग्टन :- कोरोनाच्या रुग्णांची संख्या अमेरिकेत धोकादायकरित्या वाढते आहे.’वर्ल्डोमीटर’ने दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी कोरोनाचे २६ हजार ४७३ नवे रुग्ण आदळलेत. १०४९ रुग्णांचा मृत्यू झाला आणि कोरोनाच्या रुग्णाची संख्या २ लाख १५ हजारांवर गेली. कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत एकूण ५ हजार १०२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा, अमेरिकेवरच्या ९/११ हल्ल्यातील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त झाला आहे. अल् काईदाने २००१ मध्ये केलेल्या त्या हल्ल्यात अमेरिकेत तीन हजार बळी गेले होते.अमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या चीन, इटली आणि स्पेन या देशांपेक्षा अधिक झाली आहे. दर अडीच ते सहा मिनिटांच्या अंतराने अमेरिकेत कोरोनामुळे एक मृत्यू होतो आहे. अमेरिकेतील अनेक रुग्णालयातील शवागारांमध्ये शव ठेवायला जागा नाही.

कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला बसला आहे. न्यूयॉर्क राज्यात बुधवारी करोनाबाधितांची संख्या ८३ हजार ९०१ झाली. २२१९ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ५०५ मृतांची नोंद करण्यात आली. न्यूयॉर्कनंतर न्यूजर्सीत करोनाचे २२ हजार २५५ रुग्ण आढळले आहेत. मृतांचा आकडा ३५५ झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाची स्थिती चिघळत असून प्रशासनाने संसर्गाच्या नियंत्रणासाठी पावले उचलली आहेत. आगामी ३० दिवस महत्त्वाचेआहेत, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणालेत.

अमेरिकेत करोनाच्या प्रतिबंधासाठी ३० एप्रिलपर्यंत ‘सामाजिक दूरत्वा’सह अनेक कडक निर्बंध घातले आहेत. तरीही अमेरिकेतील मृतांचा आकडा एक लाख ते दोन लाखाच्या दरम्यान असेल, असा इशारा ‘व्हाइट हाउस’च्या ‘कोरोना’विषयक ‘टास्कफोर्स’च्या सदस्य देबोराह बर्क्स यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे दिला आहे. आवश्यक खबरदारी घेतली नाही, तर मृतांचा आकडा १५ ते २० लाखांच्या घरात जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निर्बंध, सामाजिक दूरत्व हाच कोरोनाचा प्रसार रोखण्याचा एकमेव मार्ग आहे, हा मार्ग वेदनादायी असला आणि त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असला, तरी हाच एक उपाय आहे, यावर व्हाइट हाऊसमधील अधिकारी तसेच टास्कफोर्सचे सदस्य भर देत आहेत. कोरोनामुळे निधन झालेल्यांचे अंतिमसंस्कार करणे कठीण झाले आहे. न्यूयॉर्कची स्थिती फारच गंभीर झाली आहे. तीस वर्षांपासून मृतांचे दफन करणाऱ्या ‘इंटरनॅशनल फ्युनरल कंपनी’चे सीईओने मर्मो म्हणाले की, मृतदेह सांभाळणे आता हाताबाहेर गेले आहे.