कोरोना ही सामूहिक जबाबदारी, दादा उवाच

Shailendra Paranjapeबारामतीमध्ये कोरोना आटोक्यात आला… त्यासाठी भिलवाडा पॅटर्न राबवण्यात आला. मग तो भिलवाडा पॅटर्न बारामती पॅटर्न नावानं पुण्यात राबवा आणि कोरोना आटोक्यात आणा, असं पुण्याचे पालकमंत्री आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या पंधरवड्यात सांगितलं होतं. पण पब्लिक मेमरी इज शॉर्ट अर्थात लोक फार मागच्या गोष्टी लक्षात ठेवत नाहीत, हे अजितदादांना पक्कं ठाऊक असल्यानं काल, शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत एक विधान केलं. त्याचा अर्थ नेमका काय लावायचा हे लक्षात येत नाही; पण एक अर्थ असा निघू शकतो की, बारामती पॅटर्न काही पुण्याला लागू पडलेला दिसत नाही.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात कौन्सिल हॉलमध्ये बैठक घेतली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह आळंदी-देहू देवस्थान संस्थानचे पदाधिकारी तसंच सर्व ज्येष्ठ सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीचं सरकारी प्रसिद्धिपत्रकानुसार देण्यात आलेलं वृत्त असं सांगतंय की, कोरोना संसर्ग कमी करणं किंवा कोरोनाच्या संकटाचा मुकाबला ही सामूहिक जबाबदारी आहे, असं विधान अजित पवार यांनी केलंय.

कोरोनाचा मुकाबला ही सामूहिक जबाबदारी आहेच आणि हे देशव्यापी लॉकडाऊन करताना तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनीही देशाच्याही आधी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करताना स्पष्ट केलंय. मग पवार यांना कोरोनाचा मुकाबला ही सामूहिक जबाबदारी आहे, असं नेमकं कालच्या बैठकीच्या वेळी लक्षात आलं की बारामती पॅटर्न पुण्यात चालत नाही, हे लक्षात आलं? ही बैठक झाल्यानंतर या संदर्भात आलेली सरकारी बातमी पाहिल्यावर या विधानाविषयी नोकरशाहीतल्या काही लोकांची मतं जाणून घेतली. तसंच या विषयाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशीही बोलणं झालं तेव्हा हे लक्षात आलं की, कोरोना आल्यानंतर सुरुवातीला अजित पवार काही दिवस पुण्यात फिरकले नव्हते आणि त्याचं कारणही पुण्यातल्या अधिकाऱ्यांमध्ये नसलेली एकवाक्यता. त्यामुळंच बारामती पॅटर्न राबवा असं म्हणणारे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना ही सामूहिक जबाबदारी आहे, असं सांगतानाच पुण्यनगरीच्या चिकित्सक, संशोधकवृत्तीच्या आणि त्यासाठी वेळीअवेळी घराबाहेर पडून रिकाम्या रस्त्यांचे  छायाचित्र कॅमेराबद्ध, मोबाईलबद्ध करून फॉरवर्डणाऱ्या पुणेकरांनाही ही सामूहिक जबाबदारीची कानपिचकी दिली आहे.

पुण्यनगरीतले अभ्यासू, चिकित्सक, प्रत्येक वाक्याचा कीस काढून आणि प्रत्येक योजनेवर वाचकांच्या पत्रातून आपली एक्स्पर्ट ओपिनियन्स देऊन चिरफाड करण्यात पटाईत असलेले नागरिक अजित पवारांचा हा सामूहिक जबाबदारीचा सल्ला आणि मत फार गांभीर्याने घेतील असं दिसत नाही; कारण कोरोना तुलनेनं कमी असलेल्या भागातले म्हणजेच शहराच्या पश्चिम भागातले नागरिक दुकानांमध्ये  स्वतःहून शिस्तीनं पुरेसं अंतर राखून जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना दिसत आहेत; पण त्यांना हेच शल्य आहे की, धोकादायक स्थितीतून रेड झोनमधून बाहेर पडून ठिकठिकाणी फिरून कोरोना पसरवणाऱ्यांवर काहीही कारवाई झालेली नाही. इतरांच्या निष्काळजीपणामुळं शहराचं नाव वाईट होतंय आणि एकीकडे आम्ही मध्यमवर्गीय सर्व प्रकारचे कर मुकाटपणे भरत असूनही बेसुमार वाढलेल्या झोपडपट्ट्या, त्यात राहणारे ४० ते ४५ टक्के पुणेकर (?) आणि पुण्याबाहेरून, राज्याबाहेरून, परदेशातून येऊन रस्त्यावर भीक मागणारे, रस्त्यालाच घर करणारे या सर्वांवर काहीही कारवाई होत नाही, हे शल्य प्रामाणिक मध्यमवर्गीय करदात्यांना नक्कीच आहे. ठिकठिकाणी दुकानांच्या रागांमध्ये लोक कोरोनाची भीती व्यक्त करतानाच हे असंच चालायचं, असाही सूर लावताना दिसत आहेत आणि म्हणूनच कोरोना फक्त सामूहिक जबाबदारी नाही तर कोरोनानंतरच्या काळात शहरं, आपले परिसर, गावं, राज्यं आणि देश नीट राहील हीदेखील सामूहिक जबाबदारी आहे, याचं भान आलं तर अजित पवार यांना झालेली उपरती कारणी लागेल…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला