
वॉशिंग्टन : ‘कोरोना’ ही चीनने जगाला दिलेली सर्वांत वाईट भेट आहे, या शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या साथीसाठी चीनला जबाबदार ठरले आहे. चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीने जगाला मोठा धक्का दिला आहे. अमेरिका तर निर्माण झालेल्या स्थितीमुळे हादरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यासाठी जाहीरपणे चीनला जबाबदार ठरवून चीनबाबत संताप व्यक्त करत आहेत.
ट्रम्प म्हणाले की, कोरोना व्हायरस ही संपूर्ण जगाला चीनकडून मिळालेली एक अत्यंत वाईट भेट आहे. कोरोना व्हायरसमुळे आणखी मृत्यू झाल्यास अमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या लाखापर्यंत पोहचणार आहे. या साथीला बळी पडलेल्यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्रांबद्दल मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. कोरोनासोबत लढणाऱ्यांवर माझे प्रेम आहे. देव नेहमी तुमच्या सर्वांबरोबर राहो.
सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत
अमेरिकेत आतापर्यंत १७ लाख ५८ हजार ४२२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ३ लाख ७८ हजार ५६६ रुग्ण बरे झाले आहेत; परंतु १ लाख २ हजार ९१७ रुग्णांचा या साथीने बळी घेतला आहे. सध्या जगात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५९ लाख ५ हजार ४१५ आहे. २५ लाख ७९ हजार ६७८ रुग्ण बरे झाले आहेत व जगभरात कोरोनामुळे ३ लाख ६२ हजार २४ लोकांचा बळी गेला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला