कोरोना, उच्च न्यायालय आणि सकारात्मकता

corona-high-court-and-positivity - Maharastra Today

Shailendra Paranjapeउच्च न्यायालयाने प्रसिद्धी माध्यमांना, वृत्तपत्रांना कोरोनासंदर्भातले वार्तांकन संयमाने करण्यास सांगितले आहे. रोज कोरोनाच्या संदर्भातल्या नकारात्मक बातम्या आल्याने समाजात नकारात्मकता पसरू शकते आणि ही गोष्ट तशा अर्थाने खरीही आहे. वृत्तपत्रात काम करणाऱ्यांना हे माहीत आहे की, सकारात्मक बातमी दिली तर त्याची समाज तितकीशी दखल घेत नाही. त्यामुळेच खून, दरोडे, बलात्कार आणि एकूणच क्राइमच्या गुन्हेगारीच्या बातम्या या जास्ती वाचल्या जातात आणि टीव्ही वाहिन्यांवरही क्राइम डायरी, एक शून्य शून्य, सीआयडी असे कार्यक्रम हिट ठरतात. मुलं खूप वेळ टीव्ही बघतात अशी मागच्या पिढीत तक्रार होती आणि ती टीव्हीची जागा आता मोबाईलने घेतलीय. मोबाईल गेम्सने घेतलीय. त्यामुळे टीव्ही वाहिनीवर, वृत्तपत्रात किंवा मोबाईलवर कोणते गेम उपलब्ध आहेत, हे लक्षात घेऊन आपल्या हिताचा कोणता कार्यक्रम आहे, कोणती बातमी आहे, याचा विचार करायला शिकवण्याची खरी गरज आहे.

सामान्यपणे फायद्याची गोष्ट कोणालाही शिकवण्याची गरज नसते. प्रत्येकाला आपला फायदा कशात आहे, हे पटकन समजते. पण टीव्ही, मोबाईल किंवा तत्सम सोशल मीडियासारख्या माध्यमांमध्ये एक गोष्ट आपसूक घडत जाते आणि ती आहे प्रवाहपतित होण्याची. माझ्या मित्रांकडे स्मार्ट फोन आहे म्हणून मला हवा, सगळ्यांकडे आयफोन आहे म्हणून मला हवा, याऐवजी माझी गरज काय आहे आणि मी त्याचा वापर कसा करणार आहे, हे लक्षात घेऊन टीव्ही, फोन किंवा कोणतेही गॅजेट खरेदी केले तर हा संभ्रम राहणार नाही. वास्तविक टीव्ही वाहिन्यांमध्येही डिस्कव्हरी किंवा अँनिमल प्लॅनेट अशा वाहिन्या खूप चांगले कार्यक्रम देतात; पण ते पाहणाऱ्यांची संख्या तुलनेने तितकी जास्ती नाही. रात्री ९ नंतरच्या सासबहू सिरियल्स किंवा प्रत्येक घरात एक तरी महिला कारस्थानी असलेल्या मराठी मालिकाच लोक जास्ती बघतात, हे वास्तव आहे.

सांगायचे तात्पर्य हे की, प्रसारमाध्यमांना किंवा टीव्हीला दोष देण्यात फारसा अर्थ नाही; कारण टीव्हीचा रिमोट आपल्या हाती असतो आणि पेपरातही काय वायाचे, हेही आपणच ठरवत असतो. सकाळी सकाळी पेपर उघडला की अपघात, खून या बातम्या किंवा सध्या कोरोनाचे इतके बळी, तितक्यांना संसर्ग याच बातम्या असतात, अशी तक्रार करण्यात अर्थ नाही. तरीही उच्च न्यायालयाने माध्यमांना कोरोनाविषयक बातम्या देताना संयम बाळगण्यास सांगितले आहे आणि त्याचा अर्थ हाच आहे की, समाजात निराशा किंवा नकारात्मकता वाढीस लागलेली आहे.

त्यामुळे इतकेच सांगतो की, कोरोना (Corona) संसर्गग्रस्तांचा आकडा कालच्या दिवसभरात राज्यपातळीवर कमी झालाय आणि राज्यात तसेच पुण्यामध्येही बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होतेय, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. पुण्यापुरते म्हणाल तर कोरोना हाताबाहेर जात असल्याने का होईना पण महापालिका खासगी डॉक्टरांना कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यास तयार आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे. पुण्यामध्ये खासगी डॉक्टरांनाही कोरोना उपचाराच्या कामात सहभागी करून घ्यावे, असं या लेखमालेत यापूर्वी मांडण्यात आलं होतं. पुण्यातले दीडशे खासगी डॉक्टर्स कोविड सेंटर सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याचंही वृत्त प्रसारित झालंय आणि ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे. पुण्यातच नव्हे तर गावागावांतून खासगी डॉक्टर्स तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य, हृदरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग संघटना, ऑर्थोपिडिक तज्ज्ञांची संघटना, कर्करोगतज्ज्ञांची संघटना, आयसीयूतज्ज्ञांची असोसिएशन, भूलतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ अशा विविध क्षेत्रांतल्या मातब्बर आणि शहर तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असलेल्या डॉक्टरांनी पुढाकार घेऊन कोविडमध्ये सेवा देण्यासाठी पुढे यायला हवे.

तसे झाल्यासच सामान्य माणसाला आपल्या जीवाला खरंच काही किंमत आहे, हे जाणवेल. कोरोनाच्या नकारात्मक बातम्यांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या एका वृद्धाच्या बातमीने मात्र सर्वच कोरोना रुग्णांना बळ मिळू शकेल. औसा इथले १०५ वर्षांचे धोंडिबा अंधारे यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुळात १०५ वयाचे धोंडिबा हे कणखर वृत्तीचे आणि आशावादी असल्यानेच त्यांनी आत्मविश्वासाने कोरोनावर मात केलीय आणि त्यांना आता रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे, असं वृत्त स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालंय. कोरोना रुग्णांना या बातमीतून नक्कीच आत्मविश्वास मिळेल की, १०५ वर्षांचे धोंडिबा अंधारे कोरोनाला हरवू शकतात तर मी का नाही हरवू शकणार? उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना संयमाने बातम्या द्यायला सांगितले आहे; पण धोंडिबा अंधारे यांची बातमी जोरशोरसे सर्वांना सांगायला हवी. त्यातूनच कोरोनाला हरवण्याची इच्छा सर्वांच्या मनात निर्माण होईल.

ही बातमी पण वाचा : करोनाच्या अंधारातही काही दिवे आहेत…

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button