चीनने लपवला कोरोना

China Corona Virus Editorial

badgeचीनची लबाडी आता जगाच्या लक्षात येऊ लागली आहे. कोरोनाच्या निमित्ताने चीनला जग जिंकायचे होते. म्हणून चीनने तब्बल दोन महिने कोरोना लपवला, पसरू दिला असे आता लोक बोलू लागले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर तसा जाहीर आरोप केला आहे. कोरोनाच्या दहशतीने जागतिक शेअर बाजार घसरला. युरोप आणि अमेरिकेच्या चीनमधील तगड्या कंपन्यांचे शेअर कोसळले. चीनने ते शेअर चणेफुटाण्याच्या भावात घेतले आणि आज आम्ही कोरोनावर विजय मिळवला असे सांगून चीन मोकळा होऊ पाहतो आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेला भिकारी बनवण्याची चीनची ही आर्थिक चाल होती का?

१ डिसेंबरला चीनमध्ये त्यांच्या हुबी प्रांतातील वुहान नावाच्या एका शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला; पण तो संसर्गजन्य आजार आहे हे कबूल करायलाच तिथले आरोग्य खाते तयार नव्हते. तिथल्याच एका डॉक्टरने ‘सार्स’सारखी ही भयंकर आजाराची साथ असल्याचे बोलून दाखवले तेव्हा त्याचे तोंड बंद केले गेले. कोरोना संसर्गजन्य आजार असल्याचे ठाऊक असताना चीनने त्या शहरात लोकांना जत्रा, मेळावे करू दिले. त्याचा परिणाम होऊन रुग्णांचे लोंढे येऊ लागले. कोरोनाचा पहिला अलर्ट देणारा तो डॉक्टरही संसर्ग होऊन मरण पावला. तब्बल दोन महिन्यांनी चीनने वुहान शहर ‘क्वारंटाईन’ करणे चालू केले. ह्या दोन महिन्यांत शेकडो लोक बाहेरून चीनमध्ये आले होते आणि चीनमधून बाहेरच्या देशात गेले होते. आलेल्या आणि गेलेल्या ह्या लोकांनी आपल्यासोबत कोरोना पसरवला. आपल्याकडे कोरोनाबाधित निघालेले बहुतेक रुग्ण विदेशातून आलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी जाहीर केले तेव्हा जग हादरले; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. स्पेन, इटली, अमेरिका आणि खुद्द वुहान शहरात लोक पटापट मरू लागले होते.

एकट्या युरोपमध्ये १० हजार बळी गेले आहेत. १५० देशांना कोरोना विषाणूचा तडाखा बसला असून २० हजारांवर लोक मेले आहेत आणि दररोज हा आकडा वाढतो आहे. चीनची स्वतःचीही चार हजारांवर माणसे मेली आहेत. भारतात १७ बळी गेले असून ७०० वर कोरोनाबाधित रुग्ण आहेत. रोज हा आकडा वाढतो आहे. ह्या २४ तासांत ४ बळी गेले आणि ७५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. १८ जानेवारी ते २३ मार्च दरम्यान १५ लाख लोक बाहेरून भारतात आले आहेत. ह्या सर्वांना शोधून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागेल. ह्या १५ लाखांपैकी काही लोक कोरोनाबाधित असू शकतात. त्यांना मोकळे सोडले तर कोरोना किती भयंकर पसरेल ह्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. ‘लॉकडाऊन’ असला तरी लोक वेगवेगळ्या कारणाने बाहेर पडत आहेत. अजूनही म्हणावे तसे गांभीर्य आलेले नाही. चीन पारदर्शक वागला असता तर हे सारे टळले असते. जगापुढे ह्या महिन्या-दोन महिन्यात काय भयंकर वाढून ठेवले आहे ह्या दहशतीत जगण्याची वेळ जगावर आली आहे.