कोरोनाच्या साथीने फेरलेय शरथ कमलच्या यशावर पाणी?

Sharath Kamal

भारतीय टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याने एका दशकानंतर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या (आयटीटीएफ) टूरवरील महत्त्वाची स्पर्धा, ओमान ओपन, गेल्या महिन्यात जिंकली पण कोरोनाच्या साथीने त्याच्या या यशावर जवळपास पाणी फेरले आहे. कोरोनाच्या साथीमुळे टेबल टेनिसच्या सर्व स्पर्धा जून अखेरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यासोबतच आयटीटीएफने खेळाडूंची क्रमवारी मार्च 2020 च्या क्रमावरच गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे खेळाडूंना केवळ फेब्रुवारीपर्यंतच्या स्पर्धांतच कमावलेले गूण मिळणार आहेत. याच कारणामुळे शरथ कमलला 11 ते 15 मार्चदरम्यान खेळली गेलेली ओमान ओपन स्पर्धा जिंकूनही काहीच फायदा होणार नाही.

सामान्य परिस्थितीत 37 वर्षीय शरथ कमलला ओमान विजेतेपदाचे 1100 गूण मिळाले असते पण आता त्याला हे गूण बहुधा आॕगस्ट-सप्टेंबरमध्ये नव्याने क्रमवारी जाहीर होईल तेंव्हाच मिळतील. आता त्याला हे गूण मिळाले तर क्रमवारीत तो पहिल्या 30 मध्ये स्थान मिळवेल. फेब्रुवारीअखेर शरथ क्रमवारीत 38 व्या स्थानी होता.

आयटीटीएफने नवी क्रमवारी केंव्हा जाहीर करण्यात येईल हे स्पष्ट केलेले नाही पण जेंव्हा केंव्हा ही क्रमवारी जाहीर होईल तेंव्हा ओमान ओपनचे आपले गूण विचारात घेतले जावेत एवढीच शरथ कमलची इच्छा आहे.

याच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून विद्यमान राष्ट्रकूल विजेत्या हरमित देसाईनेसुध्दा 715 गूण कमावले पण त्यालासुध्दा हे गूण मिळतील याची शाश्वती वाटत नाही. आयटीटीएफचे वर्ल्ड रँकिंग मॕनेजर झेव्हियर लुसेरॉन यांनी हे गूण विचारात घेतले जातील असे त्याला कळवले आहे. ओमान येथील स्पर्धेत इटली व स्पेनसह काही देशांचे खेळाडू सहभागी होऊ शकले नव्हते म्हणून हा गुणांचा वांधा झाला आहे.

…जेंव्हा सचिन गोलंदाजीसाठी सामनावीर ठरला !