कोरोनाचा स्फोट : ‘त्या’ अधिकाऱ्यांची बदली कुठे करायची हे माहीत आहे; अजित पवारांची धमकी

Ajit Pawar

पुणे : मुंबईसारख्या महानगरात कोरोना (Corona) आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यात काय अडचण आहे? राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे. अधिकाऱ्यांना ‘फ्री हॅन्ड’ दिल्यानंतर पुण्यात परिस्थिती का सुधारत नाही? येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठे बदली करायची हे मला चांगलेच माहीत आहे.

अशी धमकी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पुण्यातील विधानभवन सभागृहात शुक्रवारी  (११ सप्टेंबर)  अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त कृष्‍ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुण्यातील कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे.

यामुळे अजित पवारांवर टीका होते आहे. पवार यांनी शुक्रवारी विधान भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये त्यांनी कोरोनाची साथ आटोक्यात न येण्याबद्दल अधिकाऱ्यांवर राग काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER