कोरोना : भारताच्या लसीला जगभरातून मागणी

COVID-19 Vaccine

दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आल्यानंतर जगातील अनेक देशांनी भारताकडे या लसीची मागणी केली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझीलला अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

शेजारी देशांना देणार आधी

भारताने कोरोनासंदर्भातील जे धोरण तयार केले आहे त्यानुसार सर्वांत आधी भारत शेजारच्या देशांना कोरोनाची लस देणार आहे. भारताकडे ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांनी लसीची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत इतर देशांना कोरोनाच्या लसीचा पुरवठा करताना शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देणार आहे. त्यामुळे बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना भारत आधी लसींचा पुरवठा करेल, असे एका वृत्तात म्हटले आहे.

सर्वांशी करू सहकार्य

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणालेत, भारत सुरुवातीपासून कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्धात जगभरातील देशांसोबत खांद्याला खांदा लावून लढत आहे. या लढ्यात सर्व देशांशी सहकार्य करणं हे आपले कर्तव्य आहे, अशी असल्याची भारताची भूमिका आहे.

चीननेही केली प्रशंसा

भारताने तयार केलेल्या कोरोना लसींची चीननेही प्रशंसा केली आहे. दक्षिण आशियातील आमच्या शेजराच्या देशांनी तयार केलेली कोरोना लस ही गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्याही लसीपेक्षा कमी नाही, असे चीनने म्हटले आहे. चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखामध्ये भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या कोरोनाच्या लसी या चीनच्या कोरोना लसीइतक्याच प्रभावी असल्याचे म्हटले आहे. संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भारताच्या कोरोना लसी या उत्तम आहेत, असेही या लेखात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER