कोरोनाचे संकट याआधी आलेल्या संकटांपेक्षा अधिक भयंकर; सगळ्यांनी एकत्रित लढा द्यावा – शरद पवार

Sharad Pawar

मुंबई : सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापूर्वी मी अनेक नैसर्गिक संकटे बघितली आहेत. भूकंप, महापूर, रोगराई, दुष्काळ अशी  अनेक संकटे मी आपल्या जीवनात बघितली आहेत. मात्र कोरोनाचे संकट अत्यंत भयंकर आहे. त्याच्यावर मात करायची असेल तर एकमेव उपाय म्हणजे सर्वांनी  केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज व्यक्त केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर त्यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, कोरोनाचा मानवांसह पशुपक्ष्यांवरही परिणाम झाला आहे. सरकार याबाबत काही सूचना देत आहे. सरकारचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. या सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष कराल तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. कोरोनामुळे संपूर्ण जगाची आर्थिक परिस्थिती ढासळणार आहे. संकटाचा अर्थव्यवस्थेवर वर्षे-दीड वर्षे परिणाम राहील. शेती, सहकार, उद्योग व्यवसायाला याचा सर्वांत जास्त फटका बसणार आहे. शेतीच्या दृष्टीने सरकारने काही योग्य पावले उचलण्याची गरज आहे. कारण आताचे पॅकेज पुरेसे नाही. त्यांना आणखी मदतीची गरज आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने  आंबा, केळी, द्राक्ष फळ बागायतदारांसाठी वेगळे पॅकेज दिले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारची ही जबाबदारी आहे. पीक कर्ज परतफेड करणे शेतकऱ्यांना सध्या शक्य नाही. यासाठी मी पत्रव्यवहार करून तशी मागणी करणार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला चार-पाच वर्षांचे हप्ते पाडून द्या. तसेच मोफत धान्य देताना शेतकऱ्यांकडे असलेला शेतमाल विकत घेण्याबाबत विचार करावा. शेतकरी अडचणीत सापडला आहे, शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला धक्का बसला आहे. जेवढ्या कंपन्यांत कामगार काम करतात, त्या कंपनी मालकांनी कामगारांना जपावं, त्यांच्या वेतनाची खबरदारी घ्यावी. कोरोनाशी लढण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एका महिन्याचे वेतन देणार असल्याचेदेखील पवारांनी घोषित केले. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांकडून शिस्तीची गरज आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडवू नका, असंही आवाहन शरद पवार यांनी पोलिसांना केलं.

संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सर्व शक्ती वापरा. दोन्ही सरकारने कडक पावले उचलावीत. सरकारनं आरोग्य आणि पोलीस विभागाला प्रोतसाहन देण्याची गरज आहे. राज्य सरकार चांगलं काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही निर्णय घेत आहेत, ते योग्यच आहेत.

आपल्या राज्यातले आरोग्य कर्मचारी, पोलीस हे जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यांना घराबाहेर न पडून सहकार्य करा. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करा, असे म्हणत त्यांनी सरकारच्या कार्याचं आणि आरोग्य व पोलीस विभागाचं कौतुक केलं.

राष्ट्रवादीपाठोपाठ आता शिवसेनेचे आमदार, खासदारही एक महिन्याचा पगार साहाय्यता निधीला देणार