राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर; सर्वांनी सहकार्य करा, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन

devendra fadnavis

मुंबई : कोरोनाबाधितांचा (Corona) वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन (Lockdown) अर्थात शनिवार-रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समर्थन केले आहे. तसेच राज्यातील जनतेला शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करण्याचेही आवाहन केले.

राज्यात दिवसेंदिवस मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही कडक निर्णय घेण्यात आले असून, त्यानुसार राज्यात आता शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. तर ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच, यावेळी त्यांनी सरकारने कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत चर्चा करायला हवी व राज्यात प्रादुर्भाव का वाढत आहे, याबाबत विवेचन करायला हवं, असादेखील सल्ला राज्य सरकारला दिला.

राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपाची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, “राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचं लक्षात येत आहे. यामध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन आणि अन्य दिवशी कडक निर्बंध अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं लक्षात येत आहे. आम्ही जनतेला आवाहन करतो, की या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनादेखील आम्ही आवाहन केलं आहे, की आताची कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांनी व नेत्यांनीदेखील सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करता येईल, त्या दृष्टीने लसीकरण मोहिमेत भाजपाचे कार्यकर्ते सक्रियतेने सहभागी होतील. हादेखील निर्णय आम्ही घेतलेला आहे.”

तसेच,एकूणच कोरोनाची परिस्थिती ही महाराष्ट्रात प्रचंड भयावह आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ ५७ हजार केसेस कोरोनाच्या महाराष्ट्रात आहेत आणि मोठ्या प्रमाणात मृत्युसंख्यादेखील वाढते आहे. कोरोनाचं पुन्हा थैमान हे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशा परिस्थितीत ज्या काही उपाययोजना सरकारच्यावतीने केल्या जातील, त्या उपाययोजनांना सहकार्य करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं आम्ही समजतो, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

याचबरोबर “आमची हीदेखील अपेक्षा आहे, सरकारने केवळ लॉकडाऊन किंवा निर्बंधांची चर्चा करून चालणार नाही. त्यासोबत नवीन स्ट्रेन काय आहे? तो इतक्या वेगाने का वाढतो आहे? तो इतक्या वेगाने महाराष्ट्रातच का वाढतो आहे? त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? या संदर्भातदेखील सरकारने विवेचन व चर्चा केली पाहिजे.” अशी मागणीदेखील विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली.

मी पुराव्यासाहित केंद्र सरकारने काय काय मदत केली हे दाखवलं आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारने मदत केली आहे. केंद्राने केलेली मदत गेली कुठे? असा सवाल राज्य सरकारला केला पाहिजे. सरकारने आमच्याकडून मदत मागायची, पाठिंबा मागायचा आणि त्यांनी राजकारण करायचं हे योग्य नाही. सरकारनेही राजकारण बंद केलं पाहिजे.

अशी अपेक्षा होती की कोरोना काळात ज्या बजेटमध्ये घोषणा केल्या आहेत त्या घोषणांच्या अनुरूप राज्य सरकार काही व्यवस्था उभी करेल. याकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आपण आता अशा परिस्थितीवर आहोत, मागच्या गोष्टींकडून काहीच शिकलो नाही. व्यवस्था उभ्या केल्या नसल्याने लोकांना मोठा त्रास होत आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button