कोरोनाच्या रुग्णांसाठी १०० डब्यांची कोरोना केअर ट्रेन लवकरच सज्ज होणार

100 Beds Care Train

लखनौ : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता रेल्वे विभागाने आलमबाग येथील प्रवासी आणि मालडबा कारखान्यात येत्या तीन दिवसांत १०० बेड असणारी कोरोना केअर ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये १०-१० रुग्ण आयसोलेट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, रेल्वेने एचएचबी कोचशिवाय जुने कंव्हेंशनल कोचसुद्धा आयसोलेशन वॉर्ड बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

याबाबत डीआरएम संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, आलमबाग वर्कशॉपमध्ये दोन असे हॉस्पिटल तयार करण्यात येतील. दुसरे  हॉस्पिटल पुढील आठवड्यात तयार होईल. ट्रेनच्या कोचमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याची जबाबदारी मुख्य कारखान्याचे व्यवस्थापक मनीष पांडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

प्रत्येक कोचमध्ये डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या राहण्याची सोय असणार आहे. यासाठी कोचमध्ये २२० व्होल्टचे स्वीच लावण्यासोबत मध्यभागी असणारे आणि बाजूला असणारे बर्थ हटविण्यात आले आहेत. यासोबत एक पँट्रीकार, दोन बोगी आणि एक जनरेटर कारसुद्धा जोडण्यात येणार आहे.