कोरोनामुळे मुंबई महापालिकेचे कंबरडे मोडले, १० हजार कोटींचा तोटा; कर्जाचा बोजा येणार!

BMC - Coronavirus

मुंबई : कोरोनामुळे (Corona) मुंबई महापालिकेला (BMC) आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. महापालिकेने नुकताच २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेला कोरोनामुळे सुमारे दहा हजार कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे महापालिकेला या आर्थिक वर्षासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागणार आहेत.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प ३९ हजार ०३८.८३ कोटींचा आहे. गेल्यावर्षी अर्थसंकल्प ३३ हजार ४४१.०२ कोटी इतका होता. पालिकेच्या उत्पन्नात घट झाली असली, तरी पालिकेचा अर्थसंकल्प १६.७४ टक्क्याने वाढला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केलेली नाही. तसेच मालमत्ता कर जसाचा तसाच ठेवण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी हा दिलासा असल्याचे सांगितले जात आहे.

महसूली उत्पन्न, मालमत्ता करात कपात

महापालिकेने या आर्थिक वर्षामध्ये महसूली वसुलीचे लक्ष्य २२ हजार ५७२.१३ कोटीं रुपये होते. मात्र, यात ५ हजर ८७६.१७ कोटी रुपयांची घट झाली आहे. मालमत्ता कराचेही उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहेत. या वर्षात ४ हजार ५०० कोटीं रुपये मालमत्ता कराच्या वसूलीचे उद्दिष्टे ठेवले होते. प्रत्यक्षात, पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीत २ हजार २६८.५८ कोटींची आणि विकास नियोजन खात्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नातही पालिकेला २ हजार ६७९.५२ कोटींची घट झाली आहे. मालमत्ता कर, महसुली उत्पन्न आणि विकास नियोजनातून मिळणारे उत्पन्न आदींची बेरीज करता पालिकेला यंदाच्या वर्षात १० हजार ८२३.२७ कोटींचे नुकसान सोसावे लागले आहेत. हा तोटा झाल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरे सरकारने (Thackeray Government) ५ हजार कोटी थकवले

राज्यात आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच (Shiv Sena) सत्ता आहे, असे असतानाही ठाकरे सरकारकडून पालिकेला त्यांची वसुली करता आली नाही. सरकारकडे पालिकेचे विविध हेडअंतर्गत ५ हजार २७४.१६ कोटी आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे ३ हजार ६२९.८३ कोटी तर, ‘एमएमआरडीए’कडे १२१ कोटी रुपये थकले आहेत. राज्यात कॉंग्रेसची सत्ता होती तेव्हा शिवसेना हे पैसे मिळवण्यासाठी पालिकेत रणकंदन करत होती. मात्र, “दोन्हींकडे शिवसेनेचीच सत्ता आहे. तरी हे पैसे पालिकेला का मिळत नाहीत?” असा सवाल पालिकेतील विरोधकांकडून केला जात आहे

या अर्थसंकल्पामध्ये आयुक्तांनी राखीव निधीतून ४ हजार कोटी रुपये काढून भांडवली खर्च करण्यात येईल व ५ हजार रुपये कोटींचे कर्ज घेण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे या कर्जाचा बोजा कुठे तरी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांवर येणार आहे, असा दावा सपाचे पालिका गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER