कोरोना प्रतिबंध : पुण्यातील शाळा-कॉलेज 14 मार्चपर्यंत बंद

School College

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत यापूर्वी पुणे जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश १४ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळासुद्धा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली. साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत कायम असल्याचेही जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. परंतू पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात येत आहेत मात्र ऑनलाईन पध्दतीने शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा सुरु राहतील.

तसेच पुणे जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नियोजित परिक्षा आवश्यक असल्यास कोरोना उपाययोजनांचे पालन करुन घेण्यात याव्यात. शक्यतो ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER