महापालिकेच्या गाडीतून स्पीकरवरून औरंगाबादेत खासदारांची प्रत्यक्ष जनजागृती

विनाकारण फिरणाऱ्यांना खा. इम्तियाज जलील यांचे आवाहन

Imtiaz Jalil

औरंगाबाद : कोराेना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असले तरी अनेक हौशी लोक विनाकारण फेरफटका मारण्याच्या बाहण्याने बाहेर निघतात. त्यामुळे अनेकांना पोलिसांचे दंडुके देखील खावे लागत आहेत. एवढी गंभीर परिस्थती असून देखील लोकांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील स्वतः जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले.

शहरातील काही भागांमध्ये नागरिक सर्रास रस्त्यावर संचार करत आहेत. अशा भागांमध्ये इम्तियाज जलील महानगरपालिकेच्या गाडीत बसून जात आहेत. हातात माईक घेऊन लोकांना घरात बसण्याचे आवाहन ते करत आहेत. पोलिसांनी काही कारवाई केली तर, कोणीही मदतीला येणार नाही, असा दम देखील इम्तियाज जलील यांनी भरला आहे. जलील यांच्या प्रयत्नांना काहीअंशी यश येत असले तरी अद्याप विनाकारण फिरणाऱ्या लोकांना या रोगाचे गांभीर्य आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.