करोनानंही टेकले यांच्यापुढे हात…

Saurab Rao

Shailendra Paranjapeपरिस्थितीमुळे शहाणपण येण्यापेक्षा ते सुनियोजित पद्धतीने आलं तर कधीही चांगलंच. पण हे शहाणपण सरकार, प्रशासन यांच्यासंदर्भातलं असेल तर मग काय, केव्हाही आलं तरी स्वागतच करावं लागतं. तसंच काहीसं देर आये दुरुस्त आये, या पद्धतीचा निर्णय अखेर सरकारनं घेतलाय म्हणूनच त्याचं देर आये दुरुस्त आये म्हणत स्वागतच करायला हवं.

हे शहाणपण आहे विकेंद्रित पद्धतीनं आरोग्य सुविधा निर्माण करण्याचं. पुणे (Pune) शहरावर करोनाचा (Corona) ताण पडतोय आणि त्यातही २५ ते तीस टक्के रुग्ण हे पुण्याबाहेरचे म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आणि इतर शहरातले आहेत, हे स्थानिक वृत्तपत्रांनी वारंवार प्रसिद्ध केलंय. त्यामुळेच अखेर परिस्थितीच्या रेट्यामुळं का होइना पण सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा शहरांमधेही कोविड केंद्रं सुरू करण्यात येत आहेत.

पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अशा प्रकारची कोविड केंद्रं (COVID Center) या सर्व शहरांमधे सुरू करत आहोत, असं सांगितलंय. त्याबरोबरच ही केंद्र सुरू व्हायला दोन महिने लागणार असले तरी पुण्यावरचा ताण खचितच कमी होईल, असंही त्यांनी सांगितलंय.

वास्तविक, मार्च महिन्याच्या अखेरीस करोनासाठी केलेला पहिला लॉकडाऊन (Lockdown) झाला. त्यानंतर अनलॉकपर्वही आलं. अर्थचक्राला गती देण्याची भाषाही झाली पण हे सारं करताना भूछत्रासारख्या उगवलेल्या तज्ज्ञांकडून, काही अधिकाऱ्यांकडून वारंवार हे सांगितलं गेलं होतं की जुलैमधे करोनाचा पीक येईल, सप्टेंबरमधे पीक येईल. हे तर काहीच नाही करोनाचा खरा जोर ऑक्टोबरमधे असेल. काहींनी पावसाळा गेला की करोनाही जाईल, असंही छातीठोकपणे सांगितलं होतं.

वास्तविक करोनाचा विषाणू नवीन, रोग नवीन, केरळसारख्या राज्यात करोना संसर्ग कमी करण्यात सुरुवातीला यश मिळाले तेव्हा त्या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी थेट केंद्र सरकारवर टीका करत केरळनं कसा करोना नियंत्रणात ठेवला, असा लेखच इंग्रजी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केला. पण नंतर केरळमधे रुग्ण वाढले आणि ते मंत्री तोंडावर पडले. त्यामुळे करोनाच्या संदर्भात कोणीच छातीठोकपणे काही सांगू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याकडेही करोनाचे हे सारे अंदाज व्यक्त होतानाच करोना इतक्या लवकर जात नाही, हे स्पष्ट झाले होते.

तरीही सरकारी यंत्रणांच्या पातळीवर म्हणजे महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास पुणे मुंबई देशपातळीवर रुग्णसंख्येबद्दल आघाडीवर असताना व्हेंटिलेटर्स, प्राणवायूसज्ज खाटा लागतील, हे एप्रिल मे महिन्यात लक्षात आले नाही का… आजही पुण्यात रुग्णसंख्या वाढल्यावर ८० टक्के प्राणवायू आरोग्यसेवेसाठी आणि वीस टक्के उद्योगांना राखीव, असा सरकारी निर्णय आहे. त्यामुळे अनेक उद्योग डबघाईला येतील आणि काहींना कामकाज बंद ठेवावे लागेल.

त्यामुळे विकेंद्रित पद्धतीनं करोनाचा मुकाबला करावा, हे आम्ही या लेखमालेच्या सुरुवातीपासून म्हणजे अगदी एप्रिल महिन्यापासून मांडत आहोत. त्यामुळेच अखेर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यांसारख्या शहरांसाठी कोविड केंद्र सुरू होत असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं. पण खेदाची बाब अशी आहे की सुनियोजित पद्धतीनं या कोविड केंद्रांची व्यवस्था झाली असती तर पुण्यातली परिस्थितीही विकोपाला गेली नसती आणि पुण्याचं नावंही खराब झालं नसतं.

म्हणून तर देर आये दुरुस्त आये, हे खरं असलं तरी सावध ऐका पुढल्या हाका, हे घडताना दिसत नाही. म्हणूनच मग दर वेळी तहान लागली की विहीर खणायची आणि ती तयार होत नाही तोपर्यंत सामान्यांनी दारोदार टाचा घासत फिरायचं हेच चित्र पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळतंय. इतका भारी करोना पण आपल्या राज्यकर्त्यांना प्रशासनाला जागं करण्यात साफ अपयशी ठरलाय.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER