कोरोना : राज्यात आज आढळलेत नवे ६,२१८ रुग्ण, ५१ चा मृत्यू

Maharashtra Corona

मुंबई :- राज्यातील करोना संसर्ग मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढतो आहे. दररोज मोठ्या संख्येत रुग्ण आढळत असून रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढते आहे. आज दिवसभरात राज्यात ६,२१८ नवे रुग्ण आढळले, ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात रुग्णांचा मृत्यूदर २.४५ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात ५१, ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अनेक प्रमुख शहरांमध्ये लॉकडाउन व ‘नाईट कर्फ्यू’ लागू करण्यात आला आहे. आज राज्यात ५,८६९ रुग्ण बरे झालेत. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख ५ हजार ८५१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९६ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण १,५८,६०,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख १२ हजार ३१२ (१३.३२ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७९ हजार २८८ जण गृहविलगीकरणात तर २ हजार ४८४ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ५३ हजार ४०९ आहे.

राज्यात करोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. नागरिक करोनासंबंधी नियमांचं योग्य पालन करत नसल्याने करोनाची आकडेवारी वाढत असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेऊ, असा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER