संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका, ३५ गुन्हे दाखल

७२८ वाहनांवरही उगारला कारवाईचा बडगा

Crimes filed

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीतही बिनबोभाटपणे फिरणाऱ्यांना पोलिसांनी आपला दणका दाखवत विविध पोलिस ठाण्यात ३५ गुन्हे दाखल केले आहेत. तर ७२८ वाहनांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी शनिवारी (दि.२८) दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या संचारबंदीतही फिरणाऱ्यांवर पोलिसांनी आता थेट कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी गेल्या दोन दिवसाच्या काळात विविध पोलिस ठाण्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सिटीचौक-५, क्रांतीचौक-६, जिन्सी-११, जवाहरनगर-६, पुंडलिकनगर-३, छावणी, एमआयडीसी वाळुज, वेदांतनगर, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर वाहनावरही विनाकारण फिरणाऱ्या ७२८ जणांवर पोलिसांनी थेट कारवाई करत मोटार वाहन कायद्यान्वये दंड वसूल केला आहे.