साक्षीदारांची नावे उघड झाल्याने आरोपपत्राच्या प्रती परत घेतल्या

Court

नवी दिल्ली : गेल्या फेब्रुवारीत दिल्लीत झालेल्या दंगलीमागील कथित कारस्थानाच्या संदर्भात पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात, (Chargesheet) धोका संभवू शकतो म्हणून ज्यांची नावे गोपनीय ठेवणे आवश्यक होते, अशा काही साक्षीदारांची नावे उघड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर येथील न्यायालयाने त्या आरोपत्राच्या प्रती ज्यांना दिल्या आहेत, त्यांनी त्या लगेच परत कराव्या, असा आदेश दिला.

कुक्करदुमा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांनी असा आदेश दिला की, पोलिसांनी दिलेली आरोपत्राची पेनड्राईव्ह सर्व आरोपींनी व त्यांच्या वकिलांनी लगेच परत करावी व पोलिसांनी त्यांना साक्षीदारांची नावे वगळलेली नवी पेनड्राईव्ह लगेच द्यावी. वकिलांनी ती पेनड्राईव्ह उघडून वाचली असली तरी त्यात दिसलेली ‘संरक्षण दिलेल्या साक्षादारांची नावे’ (protected Witnesses) त्यांनी कोणालाही कोणत्याही प्रकारे उघड करू नयेत. न्यायालयाला दिलेल्या पेनड्राईव्हमध्येही अशीच गडबड झालेली असल्याने पोलिसांनी तीही परत घेऊन दुसरी द्यावी, असेही न्यायालयाने सांगितले.

खटल्यातील काही साक्षीदारांना धोका संभवू शकत असल्याने त्यांना संरक्षण देण्याचा व त्यांची नावे कुठेही उघड न करण्याचा आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिला होता. असे असूनही पोलिसांच्या नजरचुकीने आरोपत्रांत अशा काही साक्षीदारांची नावे उघड झाली आहेत, असे विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर अमित प्रसाद यांनी निदर्शनास आणले. ती आरोपपत्रे सर्वांकडून परत घेऊ देण्यासाठी त्यांनी अर्जही केला. त्यावर हा आदेश झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER