समन्वयामुळेच गळीत हंगाम शक्य

crushing season

कोल्हापूर :- कोरोना महामारी, लांबलेला पाऊस, ऊसतोडणी मजूरांचा प्रश्न, एकरकमी एफआरपी, कारखान्यांची खालावलेली आर्थिक स्थिती, शिल्लक साखर आणि अतिरिक्त ऊस अशी आव्हानांची मालिका पार करत यंदाचा गळीत हंगाम सुरू होत आहे. सर्वच घटकांनी समन्वयाची भूमीका घेतल्याने गळीत हंगामाचा नारळ फुटला, मात्र पुढची वाटचाल सुकर होण्यासाठी एकरकमी एफआरपीचा शब्द कारखानदारांना पाळावा लागणार आहे. येत्या काळात संघटनांच्या माध्यमातून पै-पैचा हिशोब शेतकरी घेणार असल्याने कारखान्यांची परीक्षा पाहणारा हा हंगाम ठरेल.

यंदाच्या हंगामापुढील अनेक अडचणीवर चर्चा आणि समन्यातूनच मार्ग निघत गेला. कोरोना संसर्ग काही अंशी कमी झाला तर लांबलेल्या पावसानेही माघारी फिरत साथ दिली. ऊस तोडणी कामगारांच्या दरवाढीसह इतर मागण्या मान्य झाल्याने संप मिठला. ३२ आजारी कारखान्यांची थकहमी शासनाने घेत ते सुरू ठेवले. केंद्र शासनाने इथेनॉलमध्ये पाच ते सात टक्के वाढ केली. अतिरिक्त साखरेतून सुटका होण्यास मदत होईल. साखरेची विक्री किंमत ३१ रुपयांवरुन ३५ रुपये करणे, कारखान्यांची थकीत रक्कम तसेच निर्यात धोरणाबाबतही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.

कोरोना संसर्गामुळे वृध्द आणि लहान मुलांना गावातच ठेवून ऊसतोडणी मजूर येण्याची शक्यता कमी होती. २५ ते ३० टक्के तोडणी कामगारांची संख्या कमी होण्याची भिती होती. संसर्ग कमी झाल्याने मजूरांचा तुटवडाकमी होईल. वाढीव ऊसक्षेत्रामुळे यंदाचा हंगाम लांबणार आहे. त्यामुळेच शेतकरी संघटनांनी समन्वयाची भूमीका घेत एकरकमी एफआरपीचा तोडगा मान्य केला. वाढीव २०० रुपये नंतर घेण्याचे मान्य केलेइ. आता कारखान्यांना काटेकोर आर्थिक नियोजन करत शब्द खरा करावा लागेल. अन्यथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केल्याप्रमाणे यापूर्वी हंगाम सुरू होण्यापूर्वी होणारा संघर्ष हंगाम संपल्यावर होईल. पुढील वर्षी शेतकऱ्यांच्या टोकाच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे.

आतापर्यंत कारखान्यांनी तीन वेळा कर्ज काढूनच एफआरपी दिली आहे. त्यातील दोन कर्ज फिटली असली तरी एक कर्ज अजून बाकी आहे. साखरेची आधारभूत किंमत ३१ वरुन ३५ रुपये किलो करण्याची मागणी प्रलंबित आहे. ३३ रुपये प्रतिकिलो करण्याचा निर्णय झाला असला तरी अध्याप अंमलबजावणी नाही. शासनाकडील येणेबाकी, साखर निर्यात धोरण, साखर दरवाढ आदीसाठी कारखान्यांना शासन दरबारी भांडावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER