कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला जिल्हा प्रशासनाचा आढावा

ठाणे :- कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन करून ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहेत. ही आशादायी बाब असून कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने व समन्वयाने कामकाज करत आहेत हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. ठाणे पोलीस आयुक्तालयात कोरोनाच्या अनुषंगाने आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) डॉ. शिवाजी राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे आदी उपस्थित होते. यावेळी गृहमंत्र्यांनी जिल्ह्याची कोरोना परिस्थिती, परराज्यातील मजुरांचा प्रश्न, पोलिसांमधील वाढते कोरोना रुग्ण यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

केंद्र शासनाने ठाणे जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनेची माहिती घेतल्यानंतर देशमुख म्हणाले, आपल्याला सर्व यंत्रणा व जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे. यामध्ये गर्दी टाळणे, संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. गरजू व रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना अन्नधान्य मदत उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येईल, अशी सूचना त्यांनी केली.

लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा व्यस्त आहे. कर्तव्यावर असताना पोलीस यंत्रणांनीदेखील स्वत:ची काळजी व सुरक्षितता बाळगून कर्तव्य बजवावे, असे देशमुख म्हणाले. परराज्यातील मजुरांच्या प्रवासासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या काटेकोर नियोजनाचे  देशमुख यांनी कौतुक केले. तसेच लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपायोजनाबाबतही सर्व जिल्हा यंत्रणेचे अभिनंदन केले. यावेळी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी लॉकडाऊन काळात केलेल्या कामगिरीबद्दल देशमुख यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधत अभिनंद केले व काळजी घेण्यास सांगितले.

या लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. याबाबत बारकाईने लक्ष ठेवून कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी यंत्रणेला दिले. यावेळी पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी पोलिसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच परराज्यातील मजुरांच्या प्रवासासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच कोरोना, प्रतिबंधात्मक क्षेत्र, विलगीकरण, अलगीकरण या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत सांगितले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोरोनाबाबतची जिल्ह्याची स्थिती, प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी गृहमंत्रांच्या हस्ते रिलायन्स फाउंडेशनतर्फे पोलिसांना देण्यात आलेल्या गिफ्ट व्हाउचरचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)