अधिवेशन, मातोश्रीला धमकी अन् गोंधळ

Uddhav Thackeray - Matoshree - Devendra Fadnavis

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जीवे मारण्याची आणि त्यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची दुबईहून फोनवर देण्यात आलेली धमकी आणि सोमवारपासून सुरू होत असलेले दोन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे कोरोनाची (Corona) चाचणी निगेटीव्ह असलेल्यांनाच अधिवेशनात प्रवेश देणार अशी भूमिका विधानमंडळाने घेतली असताना आता चाचण्यांमध्ये तब्बल ५० अधिकारी, कर्मचारी, पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचे संकट राज्यात रौद्र रुप धारण करीत आहे. या पार्श्वभूमीवर, विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे.

कंगना राणावतने (Kangana Ranaut) सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात आरोपांची जी झडी लावली आहे त्यामुळेही वातावरण ढवळून निघाले आहे. कंगनाच्या पोस्टरला चपला मारण्याचे कार्यक्रम शिवसैनिक राज्यभर करीत आहेत. त्यातच आता उद्धवजींना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने आपल्या नेत्याप्रति श्रद्धा व्यक्त करण्याची नवीन संधी शिवसैनिकांना मिळाली आहे. उद्धवजींच्या केसालाही धक्का लागला तर ते हात कलाम केले जातील अशी निष्ठेची भाषा सुरू झाली आहे. काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांनी लगेच मुख्यमंत्र्यांच्या आम्ही पाठीशी आहोत आणि धमक्या देणाऱ्यांना शासन घाबरत नाही, असा इशारा देऊन टाकला. राज्य शासनाच्या कोरोनाबाबतच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे विषय पुढे केले जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी फोनवरून देण्यात आली असा दावा सगळ्याच न्यूज चॅनेलनी केला खरा पण परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे (Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी मातोश्री बंगला उडवून देण्याची कोणतीही धमकी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट करीत या दाव्यातील हवा काढली. धमकी देणाऱ्याने उद्धवजींना जीवे मारण्याची धमकी दिली की नाही या बाबतही परब यांनी स्पष्ट काहीही सांगितले नाही. दुबईहून दोनतीन फोन आले होते आणि बोलणारा दारूदचा माणूस असल्याचे सांगत होता, पोलीस या प्रकरणी चौकशी करून माहिती देतील असे परब यांनी म्हटले आहे. याचा अर्थ मूळ विषयापेक्षा चॅनेलवाल्यांनी तो फारच मोठा केला असल्याचे दिसते. सुशांतसिंह प्रकरणी ज्या पद्धतीने भयंकर बातम्या चॅनेलवाले देत आहेत त्यावरून त्यांची विश्वासार्हताच धोक्यात आली आहे. असे असताना मातोश्रीप्रकरणी तरी त्यांनी तारतम्य बाळगून बातम्या द्याव्यात अशी अपेक्षा आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आयुष्यात अनेकांना अंगावर घेतले. अनेकांना आव्हान दिले पण त्यांना धमकी देण्याची हिंमत कोणी दाखविली नव्हती. दाऊदचे त्यांनी जाहीर सभांमध्ये वाभाडे काढले होते. दाऊदचा व्याही आणि पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर जावेद मियांदाद मातोश्रीवर बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीबद्दल बाळासाहेबांवर टीकाही झाली होती.

आज पहिल्यांदाच मातोश्री बंगला आणि उद्धव ठाकरे यांना धमकी दिली जात असेल तर ही बाब तमाम शिवसैनिकांना अस्वस्थ करणारी आहे. मातोश्री हे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे. या धमकीनंतर मातोश्रीवरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. उद्या कोणताही बाका प्रसंग उद्भवला तर हजारो शिवसैनिक मातोश्रीला कडे केल्याशिवाय राहणार नाहीत. आज अर्णव गोस्वामी ठाकरे परिवारावर वाट्टेल तशी टीका करीत असताना शिवसैनिक शांत आहेत कारण ते संयम दाखवत आहेत. उद्धवजींचे सरकार बदनाम होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये म्हणूनच ते अर्णवबाबत शांत आहेत पण दाऊदने काही कारवाया केल्या तर शिवसैनिक पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER