‘सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट’, राज ठाकरेंचा राजकारण्यांना सल्ला

Raj Thackeray

मुंबई : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची जयंती. यानिमित्त सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन केले असून, त्यासोबत राजकारण्यांना टोलाही लगावला आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून महात्मा गांधीं यांना अभिवादन करताना त्यांच्या विचारांचे एक ट्विट करून राजकारण्यांना सल्ला दिला आहे. राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “आज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं ह्यातच गांधींजीना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि एखादी चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना, ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय.

त्यांच्यात अहंभाव नव्हता, ‘माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे,’ हे सांगण्याचा प्रांजळपणा होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिपेक्षातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं हे सुरू झालं आहे.

‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’ हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. कोरोनाच्या ह्या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरू आहे. त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील.” असं म्हणत राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचे ट्विट करून सत्ताधारी आणि विरोधकांना सल्लावजा टोला लगावला आहे.

दुसरीकडे, राज ठाकरे यांनी लालबहाद्दूर शास्त्री यांनाही ट्विटरच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. ते म्हणाले, लालबहाद्दूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या दोन वर्षांची. पण ह्या २ वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची, कृषीक्रांतीची बीज रोवली, पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर दिलं. ह्या राष्ट्रपुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER