दुसऱ्या लाटेवरची मतमतांतरे

Preedep Avte & Uddhav Thackeray

Shailendra Paranjapeकोरोना (Corona) संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाही, असं दिलासादायक विधान राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Pradeep Avte) यांनी केलं आहे. कोरोनासंदर्भात सरकारी पातळीवर नेमकं काय चाललंय याचा थांगपत्ता सर्वसामान्यांना लागायला तयार नाही; कारण कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केल्याचं गेल्या आठवड्यातच वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालं होतं. डॉ. आवटे प्रसद्धिलोलुप अधिकारी खचितच नाहीत.

तसंच पत्रकारांना माहिती देताना मुद्दाम काही गोष्ट लपवून ठेवणे, संदर्भहीन सांगणे किंवा सरकारच्या सोयीच्या सांगणे, असं करणारेही अधिकारी ते नाहीत. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे नव्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत जास्ती आहेत आणि कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता दिसत नाही, हे त्यांचे विधान दिलासादायक आहेच; पण त्याहीपेक्षा काही नवे प्रश्न निर्माण करणारे आहे. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की, मुख्यमंत्र्यांना ही दुसरी लाट येणार आहे, याची माहिती दिली कोणी? तसंच मुख्यमंत्री काहीही सांगत असले तरीही गेले काही दिवस कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अजून पहिल्या लाटेतून नीट पार झालो नाही तर दुसरी लाट आल्यावर काय करायचे, ही भीती मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळं पसरू लागली होती.

याला जबाबदार कोण? मुळात राजकीय नेतृत्वानं त्यातही राज्याच्या प्रमुखानं कणखरपणे संकटाला सामोरं जायला हवं. मनातून घाबरले किंवा गडबडले, गोंधळले तरी किमान महाराष्ट्रातल्या ११-१२ कोटी जनतेला आपले मुख्यमंत्री आत्मविश्वासाने या कोरोनाचा मुकाबला करीत आहेत, असे किमान वाटायला तरी हवे; पण मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांमधून तर राहोच; पण त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून सरकार आत्मविश्वासानं काही करतंय असं लोकांपर्यंत पोहचत नाही. दुसरीकडे वयाची ऐंशी पार केलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यात दौरे करतात, मराठा आरक्षण असो की कोरोना, शेतकरी बिलं असोत की संजय राऊत- देवेंद्र फडणवीस यांची भेट, ते यच्चयावत विषयांवर माध्यमांशी बोलताना दिसत आहेत. अर्थात, २००४ ते २०१४ या १० वर्षांत केंद्रात मंत्री असताना मात्र पवारसाहेब राष्ट्रीय नेते होते आणि त्यामुळे ते राज्यातल्या प्रश्नांवर विचारले की आम्हा पत्रकारांवर रागवायचे आणि मला स्थानिक प्रश्नांवर विचारू नका म्हणायचे; पण मुख्यमंत्री बोलले तर नवेच प्रश्न निर्माण होण्याची भीती… त्यामुळे पवारसाहेब काही ना काही निमित्ताने राज्याच्या कुठल्या ना कुठल्या भागात जातात आणि टीव्हीवालेही त्यांना विचारतात.

मग साहेब अगदी एकही आमदार, खासदार नसलेल्या रामदास आठवले साहेबांवरही शेरेबाजी करतात. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या कंगना राणावतवरून युद्ध पेटले होते. मुंबईतल्या कोरोनावरून पंधराएक दिवस लक्ष दुसरीकडे वळवण्यात यश आले. पण कळीचा मुद्दा कोरोना हाच आहे आणि सारं जग, देश कोरोनाशी लढत असताना कोरोनाविरुद्धच्या लढ्यालाच केंद्रस्थानी ठेवून काम करायला हवं.

पण इतर मुद्द्यांना महत्त्व दिलं जात असेल तर कोरोना हाताळणीत राज्य सरकारचं काही तरी कुठे तरी चुकतंय आणि ते लोकांसमोर येऊ नये, यासाठीच हे बाकीचे मुद्दे समोर आणले जाताहेत, अशी शंका येऊ लागते. दुसरी लाट आली तर मी काय, तुम्ही काय, काही करू शकत नाही. आपण लाटेबरोबर जगायला शिकू पण कोरोनाची लाट आपल्याबरोबर जगायला तयार आहे का, हा खरा प्रश्न आहे, असं म्हणत लाटेवर स्वार व्हायचे.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER