उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच आमदार आणि खासदार यांच्यात शाब्दिक चकमक

नांदेड : शहरात आयोजित शेतकरी संवाद सभेच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच सेनेचे आमदार हेमंत पाटील आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हेमंत पाटील हे नांदेडचे आमदार आहेत. तर विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार आहेत.

नांदेडमध्ये शेतकरी संवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. तेव्हा आमदार हेमंत पाटील माईकवरुन पक्षप्रमुखांचे स्वागत करत होते. त्याच वेळी खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी आले. दुसऱ्याला माईक देण्याची सूचना राऊत यांनी आमदार हेमंत पाटील यांना केली.

पण माईक सोडण्यास हेमंत पाटील तयार नव्हते. माईक सोडायला सांगणाऱ्या राऊत यांना व्यासपीठावरच हेमंत पाटील यांनी झिडकारुन लावले. या दोन नेत्यांमधील वादामुळे शिवसेनेतील गटबाजी चव्हाटयावर आली आहे.