वडाळ्यातील बेकायदा मंदिर ‘सील’ करण्याचा आदेश महापालिकविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई

Bombay Municipal Corporation BMC

मुंबई : मुंबईत वडाळा येथे बांधण्यात आलेले एक बेकायदा मंदिर पाडण्याचा आधी दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगित ठेवून महापालिकेने त्या मंदिरास ‘सील’ ठोकावे, असा आदेश दिला आहे.

न्यायालयाने गेल्या १९ मे रोजी हे बेकायदा मंदिर पाडून टाकण्याचा आणि तेथे कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ न देण्याचा आदेश देऊनही तेथे गेल्या महिन्यात गणेशोत्सव साजरा केला गेला, असे निदर्शनास आल्यानंतर मुख्य न्यायाधीश न्या दीपंकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मंगळवारी हा आदेश दिला.

फ्लेचर पटेल यांनी अ‍ॅड. बी. जी. टांकसाळे यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे मंदिर पाडण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी, सध्याचे कोरोनाचे निर्बंध संपले की पाडकामाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन महापालिकेने दिले होते. त्यामुळे तेथे दरम्यानच्या काळात कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ देऊ नका, असे न्यायालयाने महापालिकेस सांगितले होते.

परंतु या आदेशाचे उल्लंघन झाल्याची तक्रार करत पटेल यांनी आता न्यायालयीन अवमाननेच्या कारवाईसाठी (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) अर्ज केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली तेव्हा दरम्यानच्या काळात मंदिरात गणेशोत्सवासह अन्य धार्मिक कार्यक्रम झाल्याचे महापालिकेच्या वकिलाने कबूल केले व मंदिर पाडण्याची कारवाई लगेच उद्याच (बुधवारी) करण्याची तयारी दर्शविली. परंतु महापालिकेकडून न्यायालयीन आदेशाचे सकृद्दर्शनी उल्लंघन झाले आहे. त्यामुळे त्याचा निर्णय होईपर्यंत मंदिर पाडण्यास खंडपीठाने मनाई केली. पुन्हा तेथे काही कार्यक्रम होऊ नयेत यासाठी ते ‘सील’ करण्यास सांगण्यात आले.

पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होण्यास जबाबदार असणाऱ्यांना हजर राहण्यास तसेच लेखी दिलगिरी सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER