ग्राहक संरक्षण कायदा शैक्षणिक संस्थांना लागू नाही

राष्ट्रीय ग्राहक आयोग म्हणतो ‘शिक्षण’ ही सेवा नाही

नवी दिल्ली: सन १९८६ चा ग्राहक संरक्षण कायदा शैक्षणिक संस्थांना लागू होत नाही व या संस्थांकडून विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण आणि तदनुषंगिक कामे यांचा समावेश ‘सेवां’मध्ये होत नाही, असा निकाल राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (Consumer Protection Act) दिला आहे.

उत्तर प्रदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेल्या निकालाविरुद्ध कानपूर येथील राजेंद्र कुमार गुप्ता यांनी केलेले अपील फेटाळताना राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष सी. विश्वनाथ यांनी हा निकाल दिला.

गुप्ता यांचा मुलगा रौनक कानपूर कॅन्टॉनमेंटमधील डॉ. वीरेंद्र स्वरूप पब्लिक स्कूलमध्ये शिकत होता. शाळेने मे २००७ च्या उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणक्रमाखेरीज अन्य अनुपूरक गोष्टी मुलांना शिकविण्याचे शिबिर घेतले. त्यात विद्यार्थ्यांना पोहायला सिखविले जाणार होते. गुप्ता यांनी त्यासाठी पैसे भरले व मुलाला पोहोण्याच्या प्रशिक्षण शिबिरात पाठविले. २८ मे, २००७ रोजी रौनक शाळेच्या स्वीमिंग पूलमध्ये बिडून मरण पावला. शाळेच्या निषकाळजीपणामुळे रौनकचा मृत्यू झाला व शाळेची ही सदोष सेवा आहे, या मुद्द्यावर २२ लाख रुपयांच्या भरपाईसाठी राज्य आयोगात दावा दाखल केला. परंतु राज्य आयोगाने तो फेटाळला.

राज्य आयोगाचा हा निकाल योग्य ठरविताना राष्ट्रीय आयोगाने म्हटले की, शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना कोणतीही सेवा पुरवीत नसतात व त्यांचे विद्यार्थ्यांशी नाते सेवा पुरवठादार व ग्राहक असे नसते. त्यामुळे त्यांना ग्राहक संरक्षण कायदा लागू होत नाही व त्यांनी सदोष सेवा पुरविली म्हणून त्याविरुद्ध ग्राहक न्यायालयांकडे दादही मागता येत नाही.

या संदर्भात आयोगाने अनुपमा कॉलेज आॅफ इंजीनियरिंग वि. गुलशन कुमार व इतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व मनु सोलंकी वि. विनायकामिशन युनिव्हर्सिटी या प्रकरणात राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या निकालांचा आधार घेतला. त्यांत असा स्पष्ट निर्णय दिला गेला होता की, हल्ली शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाखेरीज पुस्तकी अभ्यासाखेरीज त्यांना इतरही अनेक गोष्टी शिकविल्या जातात. त्याही शिक्षणाप्रमाणेच शाळेने विद्यार्थ्यांना दिलेल्या सेवा नसतात. मात्र खासगी कोचिंग क्लास पूर्णपणे वेगळ््या वर्गात येत असल्याने त्या निकालांमध्ये त्यांना मात्र ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेतून वगळले गेले नव्हते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER