फडणवीसांसमोर व्यथा मांडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली

Fadnavis

मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पोलिसांना सुविधा मिळत नाहीत, अशी व्यथा मांडणार्‍या वाशीम जिल्ह्यातील पोलिस हवालदार संजय घुले यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची बातमी ‘द क्विन्ट’ या ऑनलाईन वृत्तपत्राने दिली आहे.

१७ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूरहून मुंबई रस्त्याने जात असताना वाशीम जिल्ह्यातील किनीराजा पोलिस ठाण्याचे हवालदार संजय घुले यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी घुले यांनी फडणवीस यांच्याकडे व्यथा मांडली होती. पोलिसांना कोरोनाशी लढण्याची सुविधा नाही. कोरोना संक्रमणामध्ये पोलिस काम करीत असूनही पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर्स यासारख्या गोष्टी पुरविल्या जात नाहीत… आणि त्यांचा हा संभाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

दरम्यान, २८ मे रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाशीम जिल्ह्याचा दौरा केला होता, त्याच दिवशी पोलिस अधीक्षकांनी घुले यांची १४० किमी अंतरावर बदली केली. आता प्रश्न असा आहे की, आपला जीव धोक्यात घालणार्‍या पोलिस कर्मचाऱ्याने आपली समस्या समोर ठेवली तर त्याने गुन्हा केला का?

याची माहिती फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घुले यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा करणार्‍या पोलिसाची शिक्षा म्हणून अशी दूरच्या अंतरावर बदली करणे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आधीच पोलिस दल व्यथित असताना या घटनेने पोलिस दलात संतापाची भावना निर्माण झाल्याचे फडणवीसांनी पत्रात म्हटले आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कोरोनाशी लढताना पोलीस जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाशी लढताना आतापर्यंत राज्यातील सुमारे २३०० हून अधिक पोलिस कोरोनाग्रस्त झाले आहेत. अनेक पोलिसांना प्राण गमवावे लागले आहेत. अशात पोलिसांनी केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा केली तर त्यांना शिक्षा म्हणून बदली करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल खच्ची करणारे आहे.

Sanjay Ghule

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER