कामगारांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र : इंटक

INTUC - राष्ट्रीय मजदूर काँग्रेस

औरंगाबाद : केंद्र तसेच विविध राज्यांनी कामगारांच्या कामाचे तास ८ वरून १२ केले आहे. तसेच कामगार कायद्यांना स्थगिती देणे, मालक धार्जिणे बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या विरोधात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सर्व केंद्रीय श्रमिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.

उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, ओडिसा, महाराष्ट्र, राज्यस्थान, बिहार आणि पंजाब या राज्यातील सरकारने कारखाना अधिनियम १९४८ मधील तरतुदीचे उल्लंघन करून दैनंदिन कामाच्या तासात ८ वरून १२ तास अशी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये कामगार कायद्यांना स्थगिती देऊन कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल केले आहेत. या विरोधात शहरात आंदाेलन करण्यात आले.

कोरोनामुळे आम्ही सगळे घरी आहोत म्हणून भाजप सरकारची मनमानी सुरू असल्याची टीका जयप्रकाश छाजेड यांनी केली. या वेळी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, मुकेश तिगोटे, प्रवीण वाजपेयी, दिवाकर दळवी, भाग्यश्री भुजोर्के, अनिल गणाचार्य, दत्तात्रय गुट्टे, निवृत्ती देसाई, सुनील देसाई, सुरेश सूर्यवंशी, लक्ष्मणराव घुमरे, सचिन शिंदे, प्रदीप वखारिया, मनीष पांढरे, राधेश्याम जयस्वाल, रोशन तांबोळी, संदीप सूर्यवंशी, वैभव पाटील, पी.के. रामण, उपेंद्र पाटील, अमित भोसले, संजय पाटील आदींनी निषेध नाेंदवला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER