
नवी दिल्ली :- कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करत असलेले शेतकरी २६ जानेवारीला काढणार असलेल्या ट्रॅक्टर रॅलीत चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला होता, असा आरोप करत निदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांनी एका कथित शूटरला तोंड झाकून प्रसारमाध्यमांसमोर आणले. त्याला आंदोलनस्थळावरच पकडले आहे, असा दावा करण्यात आला आहे.
पकडण्यात आलेल्या त्या कथित शूटरने सांगितले की, हा कट पोलिसांनीच आखला आहे. आता त्या शूटरने दिलेल्या माहितीची तपासणी करणे सुरू आहे. दरम्यान त्याने दिलेली माहिती खोटी आहे, असे म्हणत असल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आणलेल्या त्या युवकाने सोनिपतच्या राई पोलीस ठाण्याचे एसएचओ प्रदीप यांचे नाव घेतले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राई पोलीस ठाण्यात विवेक मलिक नावाचे एसएचओ आहेत. तरुणाने स्वतःचे नाव योगेश व हरियाणाचा रहिवासी असल्याचे सांगितले. ट्रॅक्टर रॅली सुरू झाल्यावर चार शेतकरी नेत्यांवर गोळीबार करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांमध्ये मिसळलो होतो, असे तो म्हणाला. या प्रकरणी हरियाणा पोलीस चौकशी करत आहेत.
योगेशने पोलीस अधिकाऱ्याविषयी दिलेल्या माहितीत तथ्य नसल्याचे आढळले आहे. इतर माहिती किती खरी आहे की वेगळ्या हेतूने ही पत्रकार परिषद घेण्यात आली, अशी शंका हरियाणा पोलीस उपस्थित करत आहेत. हरियाणा पोलिसांनी योगेशचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त केला आहे. त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट तपासण्याचे काम सुरू आहे. तो आपले वय १९ वर्षे असल्याचे सांगतो.
ट्रॅक्टर रॅली सुरू झाल्यावर चार शेतकरी नेत्यांवर गोळीबार करणार होतो. शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडल्यावर काही गोळ्या हवेत झाडत पळून जाण्याची त्याची तसेच त्याच्या सहकाऱ्यांची योजना होती.
ट्रॅक्टर रॅली सुरू असताना गोळीबार झाला तर शेतकऱ्यांकडून गोळीबार होतोय, असे समजून पोलीस कारवाई करतील, या हेतूने योजना तयार केल्याचे सांगितले. रॅलीत अर्धे लोक पोलिसांचे असतील आणि ते जमाव पांगवण्यास मदत करतील, असे एसएचओ प्रदीप यांनी सांगितल्याचा दावा योगेशने केला.
एसएचओ प्रदीप यांना आम्ही बघितले नाही ते चेहरा झाकून आम्हाला भेटत होते आणि प्रशिक्षण देत होते, असेही योगेशने सांगितले. फक्त एकदा प्रदीप यांचा बॅच बघितला, असे तो म्हणाला.
योगेशने दिलेल्या माहितीनंतर पोलीसच शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलिन करत असल्याचे शेतकरी नेते कुलवंत सिंह म्हणाले. तर, योगेशने दिलेली माहिती खरी आहे की नाही हे तपासून माहिती देऊ, असे हरियाणा पोलिसांनी सांगितले.
#WATCH | Delhi: Farmers at Singhu border present a person who alleges a plot to shoot four farmer leaders and cause disruption; says there were plans to cause disruption during farmers’ tractor march on Jan 26. pic.twitter.com/FJzikKw2Va
— ANI (@ANI) January 22, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला