सुसंगती आणि आमच्या समजुती

Consistency and our understanding

हाय फ्रेंड्स ! आपल्याला आलेले अनुभव, आपल्याला मिळणारी माहिती आणि मोठ्यांच्या सल्ल्यांचे बोल यानुसार आपल्या मनात काही समजुती आणि विचारपद्धती निश्चित होतात. त्यापैकी काही योग्य तर काही अयोग्य असतात . ह्या अशा योग्य किंवा चुकीच्या समजुतीमुळे आपले विचार चुकीच्या दिशेने होतात याला ‘कॉग्निटिव्ह एररर्स’ असेही म्हणतात.

अशा अयोग्य समजुतीचा विचार करण्यापूर्वी हे बघायला लागते, की मानवी प्राणी ज्यात स्वार्थ आहे अशा समजुती लवकर स्वीकारतो .तर परमार्थ सार्थ साधता येईल अशा गोष्टी नाकारतो. त्याचबरोबर मोठ्यांच्या सूचनांनुसार किंवा नकळत मिळालेल्या माहितीमुळे , धर्म, जन्म -मृत्यू, पाप-पुण्य, प्रथा-परंपरा या किंवा दररोजच्या आयुष्यातील काही ठरावीक समजुती, त्यांच्या योग्यायोग्यतेचा विचार न करता आपण त्या स्वीकारतो.

विशेषतः बालपण हे व्यक्तीच्या विकासाच्या आणि जडणघडणीबाबत फार महत्त्वाचे असते. तेथे आलेले अनुभव, मिळालेली माहिती आणि मोठ्यांची वागणूक किंवा सूचना किंवा संस्कार यामुळे पुढील आयुष्यावर खूप परिणाम होत असतात. पूर्वी अशी पद्धत असायची किंवा आपले आजी-आजोबा आपल्या आई-वडिलांना सांगायचे की, फाजील लाड मुलांचे करू नका , त्यांना शिस्त लावा, त्यांना फटके द्या, छडी लागे छम छम वगैरे सगळ्या शिस्त लावण्याच्या कल्पना होत्या. त्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकानेच काही छोट्या गोष्टींसाठी धपाटे तर मोठ्या चुकांसाठी भरपूर चोपसुद्धा खाल्ला असेल. कधी कधी आई-वडिलांमध्येसुद्धा असे संवाद ऐकले असतील, की तुझ्या किंवा तुमच्या लाडामुळे वाया गेला/गेली. या संभाषणाने वर्तणुकीचे असे परिणाम झालेले असतात की रागवल्याशिवाय कुठलेही काम होऊ शकत नाही.

मग तीच परंपरा पुढे चालू राहते. घरातील काम करणाऱ्यांवर, मोलकरणीवर ओरडणे, रागावणे, त्यांचा अपमान करणे, घालून पाडून बोलणे. ऑफिसमधील सहकाऱ्यांवर ओरडणे किंवा हाताखालील लोकांवर अधिकार गाजवणे. यामुळे कामे लवकर होतील, चांगली होतील आणि आपल्या पदांमध्ये बढती होईल, पैसा मिळेल अशी समजूत असते .पण प्रत्येक वेळेला तसं घडत नाही. माणसे मात्र दूर होत जातात. हा सगळा काही पूर्वीपासूनच्या अनुभवांचा आणि माहितीचा परिणाम असतो.

त्याने दुसरे-तिसरे काही साधत नाही. उलट प्रचंड रागवून स्वतःचाच नाश, घात होत असतो. पुढचा भाग अपेक्षांचा ! अपूर्वा, सगळ्यांकडेच कुठल्याही कार्यक्रमांमध्ये खूप मदत करते. अगदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ती उचलून धरते. कुठलेही काम करायलाही मागेपुढे पाहात नाही. आणि तेही कुणीही न सांगता पुढाकार घेऊन ती करते. गृहिणी असली तरीही , इतर कुठली सबब पुढे करून ती मदतीला जाण्याचे टाळत नाही. मुळातच अतिशय उत्साही आणि कामसू स्वभाव आहे तिचा. आणि सगळं काही येतं , जमतं , त्यामुळे कुठेही तिची मदतच होते आणि कौतुकही होतं.

पण भानगड अशी होते की, तिच्याकडे जेव्हा कार्यक्रम किंवा कुठलाही उत्सव असतो, त्यावेळी तशी कुणाकडून मदत तिला मिळेल असे कोणीही तिला सापडत नाही. चार-दोन दिवस आधी येऊन कोणी राहिले तरीही, एक तर त्यांना काम सुचत नाही किंवा जबाबदाऱ्या घेण्याची सवय नसते किंवा थोडा आळशीपणा असतो. कारणे कुठलीही असली तरी वस्तुस्थिती तीच ! की तिला तिच्या घरच्या कार्यक्रमात मदत मिळत नाही. आणि मग तिची चिडचिड होते ती अपेक्षाभंगाने ! आपण इतरांकडे अशी मदत करतो, तशीच मदत त्यांनीही करावी ही तिची अपेक्षा असणे अगदी रास्त आहे. परंतु ती पूर्ण होत नाही.

तसेच शीतलकडे, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे खूप स्वागत होते, आदरातिथ्य होते. पाहुण्यांची ऊठबस होते. परंतु एवढे सगळे होत असताना ती कधी कोणाकडे गेल्यानंतर त्यांनी जर यदाकदाचित विचारले, कॉफी घेणार का? की चहा? तर तिची चिडचिड होते. कारण काय ? तर अपेक्षा तीच असते की मी जेवढे आदरातिथ्य करते तेवढेच लोकांनीही करावे.

अपूर्वा आणि शीतल दोघीही —

काहीएक अपेक्षा गृहीत धरून आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघतात. त्यांच्या अपेक्षाही रास्त आहेत. परंतु कायमस्वरूपी त्या पूर्ण होतीलच असे नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, तिचे व्यक्तित्व वेगळे आहे ,विचार वेगळा आहे ही एक गोष्ट.

दुसरी गोष्ट मी दुसऱ्यांसाठी जे करते ते करण्याची क्षमता माझ्यात आहे ,इतरांमध्ये ती असेलच किंवा असावी असा टोकाचा विचार मी करू शकत नाही. कदाचित प्रत्येकाची परिस्थिती, क्षमता, मानसिक व शारीरिक ताकद तेवढी नसेलही. असा खोलवर विचारही या गोष्टींकडे बघताना करता येऊ शकतो. तो न केल्यामुळे आपल्याला दुःखाची जाणीव होते.

आपल्याला स्वतःला आनंद मिळत असेल आणि तो जर सन्मार्ग असेल, ती चांगली विचारसरणी असेल किंवा अगदी योग्य असे कर्म असेल ,कर्तव्य असेल तर केवळ इतर लोक ते करू शकत नाही ,म्हणून ते करत नाहीत. हे समजून घेऊन आपले विहित कर्तव्य, अपेक्षांना बाजूला सारून करीत राहणे हा सन्मार्ग आपण सोडायला नको.

त्यामुळे जर परिणाम झाला ,तर इतरांवर चांगलाच होणार आहे. काही नाही तर पुढच्या पिढीवर तर हे निश्चितपणे चांगल्या संगतीचे परिणाम असणार आहेत. संगतीमुळे वृत्तीवर कसा परिणाम होतो? हे आपल्या लहानपणच्या अनुभवावरून आपण वर बघितला आहे. म्हणूनच शीतल किंवा अपूर्वा यांच्यासारख्या पालकांनी स्वतःचे सन्मार्ग न सोडून दुसऱ्यांकडून अपेक्षा न ठेवता काम करायला हवे ,तर पुढच्या पिढीवर चांगला परिणाम होईल. अशा चांगल्या क्रमाने आपल्याला स्वतःला तर आनंद मिळतोच मिळतो .

जुन्या काळामध्ये एक गोष्ट आहे की, वाल्या कोळी लूटमार करून पोट भरायचा. अशा अनेक लोकांचे प्राण त्याने घेतले होते. असा जंगलामध्ये लूटमार करत असताना त्याची भेट नारदमुनीबरोबर झाली. त्यांनी त्याला सांगितले की तू कमवीत असलेला पैसा पापाच्या मार्गांनी आलेला आहे. तुझ्या पत्नीचा व तुझ्या मुलांचा या पापात सहभाग आहे का, ते विचारून ये. हा श्रेष्ठ विचार नारदमुनींकडून वाल्याला मिळाला. आणि त्याने आपला मार्ग बदलण्यासाठी तो घराकडे गेला.

त्याने आपल्या पत्नीला यासंबंधी विचारले, मुलांना विचारले. त्यावेळी धर्मपरायण पत्नीप्रमाणे वाल्याची पत्नी या त्याच्या पापात सहभागी झाली नाही. ही पण एक प्रकारची सुसंगतीच होती. त्यामुळेच वाल्याचा वाल्मीकी होऊ शकला. त्याला त्याची चूक कळू शकली. याही ठिकाणी तिने ‘मम्’ म्हटले असते तर आज वाल्मीकी ऋषी आपल्याला माहिती नसते. वाल्या कोळी केव्हाच पडद्याआड गेला असता.

या उलट एक उदाहरण संकेतचं ! साक्षी त्याची पत्नी चांगली शिकलीसवरती असूनही घर सांभाळण्यासाठी तिने आपल्या नोकरीचा त्याग केला. त्यामुळे संकेत चांगल्या पोस्टवर जाऊ शकला. काही दिवसांनंतर साक्षी एक परीक्षा देणार होती. परीक्षेला केवळ एकच महिना राहिला होता. आता कसा अभ्यास होणार या चिंतेत ती होती. तेव्हा संकेत म्हणाला की,”नो प्रॉब्लेम ! मी एक महिना घरून काम करीन !” आणि त्याने चक्क एक महिना स्वयंपाक आणि बाळाची जबाबदारी सांभाळून घरून काम केले. साक्षीला परीक्षेत चांगले यश आले.

म्हणजेच कुठल्या गोष्टींसाठी मदत करायची आणि कुठल्या गोष्टीसाठी मदत नाकारायची यानुसार समोरच्या व्यक्तीचे हित-अहित अवलंबून असेल तर ती विवेकाने ठरवायला हवी. वरच्या सगळ्या उदाहरणांवरून आपल्या आजूबाजूच्या अनुभवातून, लोकांकडून आपल्या समजुती पक्क्या होत जातात, जितकी सुसंगती आपल्याला मिळते त्यानुसार आपल्या समजुती चांगल्या रीतीने पक्क्या होत जातात. आणि या जीवनभर आपल्याला उपयोगीही असतात. त्या आयुष्यभर परिणामही करतात. त्या कुठल्या ते पाहूया उद्याच्या भागात ? मनुष्य कुठल्या बोधात्मक चुका करतो?

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER