‘यूपीएससी’च्या उमेदवारांना जादा संधी देणे विचाराधीन

UPSC candidates
  • सरकारने सुप्रीम कोर्टास दिलेली माहिती

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) गेल्या ऑक्टोबरमध्ये घेतली गेलेली नागरी सेवा प्राथमिक परीक्षा (Civil Services Prelim) देताना कोरोना महामारीमुळे आलेल्या अडचणी लक्षात घेऊन ती परीक्षा दिलेल्या सर्वच उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक वाढीव संधी देण्याचा विषय सक्रियपणे विचाराधीन असल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले.

रचना सिंग नावाच्या एका उमेदवाराने यासाठी याचिका केली आहे. न्या. अजय खानविलकर, न्या. भूषण गवई  व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठापुढे ती आली असता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, आम्ही याचिकेतील विषयाकडे प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेतून पाहात नाही. सरसकट संधी देण्यावर केंद्र सरकार व लोकसेवा आयोग सक्रियतेने विचार करत आहेत. कदाचित यासाठी नियमांमध्ये दुरुस्तीही करावी लागे. येत्या दोन तीन आठवड्यांत यासंबंधीचा निर्णय होणे अपेक्षित आहे.

सकारचे हे निवेदन नोंदवून घेऊन खंडपीठाने याचिकेवरील पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी ठेवली.

यासंबंधीच्या कोर्टबाजीची ही तिसरी फेरी आहे. सुरुवातीस ऑक्टोबरमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी याचिका केली गेली होती. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त तीन संधी असतात. कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून परिक्षेचे आयोजन केले जात आहे, असे सरकारने सांगितल्याने न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला होता. मात्र ज्यांची ही शेवटची संधी आहे त्यांना आाणखी एक संधी देण्याचा विचार करावा, असे न्यायालयाने सरकारला सुचविले होते. त्यावर निर्णय होण्याच्या आधीच आता सरसकट आणखी एक संधी देण्याची याचिका आली. त्यावरही विचार सुरु असल्याचे सररकारने सांगितले. त्यानुसार निर्णय झाल्यास ज्यांनी ऑक्टोबरमधील परीक्षा दिली होती त्यांना सरसकट आणखी एक संधी मिळू शकेल.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER