‘मूक-बधीरांच्या ‘मास्क’वर खास लोगो लावण्याचा विचार करावा’

Mask - Bombay High Court
  • हायकोर्ट म्हणते भिकारी व बेघरांना मोफत मास्क वाटावे

मुंबई : मास्क लावलेली व्यक्ती मूकबधीर किंवा कर्णबधीर आहे हे समोरच्याला चटकन ओळखता यावे यासाठी असा दिव्यांग व्यक्तींनी वापरायच्या मास्कवर एखादा ठराविक लोगो वापरण्याचा विचार करावा, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.

‘लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन उपक्रम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या जनहित याचिकेच्या रूपाने हा विषय मुख्य न्यायाधीश न्या. दीपंकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत याचिकार्त्यांचे वकील अ‍ॅड. अजिंक्य उदाणे यांनी मूक-बधीरांसाठीच्या मास्कवर कशा प्रकारच्या लोगोचा स्टीकर लावता येईल, याचा एक नमुनाही न्यायालयास दाखवला.

मूक-बधीर व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या ओठांच्या हालचालींवरून ती काय सांगते आहे याचा अंदाज लावत असतात. तोंडाला मास्क लावलेला असला की ओठांची हालचाल दिसणार नाही. त्यामुळे मूकृ-बधीर व्यक्तींच्या मास्कवर त्या मूक-बधीर आहेत हे चटकन लक्षात येईल अशी काही खूण असेल तर समोरची व्यक्ती तिच्याशी वेगळ्या प्रकारे अधिक चांगला संवाद साधू शकेल,असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

याच अनुषंगाने भिकारी आणि रस्त्यांवर, फूटपाथवर व पुलांकाली राहणारे लोक मास्क लावत नाहीत, असा विषयही निघाला. एखादी विशेष मोहीम हाती घेऊन तुम्ही अशा लोकांना विनामूल्य मास्क का वाटत नाही, असे न्या. कुलकर्णी यांनी सरकारी वकिलास विचारले. मुख्य न्यायाधीशांनी तर मलबार हिलवरही लोक सर्रास मास्क न लावून फिरताना दिसतात, असे निदर्शनास आणले व पोलिसांनी सतर्क राहायला हवे, असे सुचविले. मुंबईत  कोरोना संसर्गाचे प्रमाण मलबार हिलवर सर्वात जास्त आहे, असे माझ्या वाचनात आले, असेही न्या. दत्ता म्हणाले.

महापालिकाही समोर असेल तर हे विषय अधिक चांगल्या  प्रकारे हाताळता येतील, असे सांगून याचिकेत महापालिकेसही प्रतिवादी करावे, असे खंडपीठाने सांगितले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button