काँग्रेसची अवस्था ‘एक्स्पायरी डेट’ संपलेल्या औषधासारखी

Rahul gandhi

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या घटनेला उद्या २५ जून रोजी बरोब्बर एक महिना होईल. ह्या महिनाभरात काँग्रेसचा कारभार ठप्प आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी काँग्रेसवाल्यांनी खूप उठापटक चालवली आहे. पण राहुलबाबा मानायला तयार नाही. केवळ राहुलबाबा घरी बसलेले नाहीत. सोनिया आणि प्रियांका ह्याही घरी बसल्यासारख्या आहेत. निर्णय करणार कोण? राहुलबाबाच्या जागी दुसरे नाव सुचविण्याची कुणाची हिंमत आहे? त्यामुळे सारे ठप्प आहे. त्यांच्या जागी अशोक गेहलोत, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांची नावं ऐकू येत आहेत. हाही विनोदच म्हटला पाहिजे.

राहुलबाबा कामावर बसायला तयार नाही. त्यांच्या ह्या अघोषित सुतकामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कारण कुणीच निर्णय करायला तयार नाही. कोण लक्ष देणार? चार महिन्यांनी महाराष्ट्र, हरियाणा राज्याची निवडणूक आहे. भाजप केव्हाच कामाला भिडला आहे. काँग्रेसचा पत्ता नाही. काँग्रेसने स्वतःहून ही परिस्थिती ओढून आणली आहे. राहुल गांधींना राजकारणात अजिबात रस नसताना सोनिया गांधी यांनी पुत्रप्रेमापोटी त्यांना आणले. लहरी स्वभावाच्या राहुलबाबाने निवडणुकीसाठी आखलेली रणनीतीच मुळात फसवी होती. नरेंद्र मोदी यांना चोर म्हणून हिणवण्याचा उलट परिणाम झाला. भाजप हिंदुत्वाचे कार्ड चालवत असताना राहुलबाबाने मुस्लिम-दलित कार्ड चालवले. त्यामुळे ध्रुवीकरण होऊन मोदींना मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. ‘ब्रम्हास्त्र’ म्हणून आणलेल्या प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात आपल्या आईपलीकडे कुणालाही जिंकवू शकल्या नाहीत. सपा-बसप यांच्याशी आघाडी न करण्याची काँग्रेसची रणनीती साफ फसली.

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसची एवढी दुर्गती झाली नव्हती. जनाधार नसलेल्या लोकांच्या हाती काँग्रेसची सूत्रे गेल्याने ही पाळी आली आहे. आपसातली गटबाजी थांबत नसल्याने एकेकाळचे कट्टर काँग्रेसी भाजपमध्ये गेले आहेत. भाजप हाऊसफुल्ल झाल्याने शिवसेनेत जात आहेत. राहुलबाबाने खरे तर लोकसभा पराभवाची कारणे शोधून नव्याने कामाला लागायला पाहिजे होते. पराभवामुळे काँग्रेसची जेवढी नाचक्की झाली नाही तेवढी राहुलबाबाच्या घरी बसण्याने झाली. काँग्रेस पक्ष आज अशा अवस्थेला पोचला आहे, की राहुलबाबा उद्या परतले काय किंवा नाही परतले काय, काही फरक पडणार नाही. ‘एक्स्पायरी डेट’ संपलेल्या औषधासारखी काँग्रेसची अवस्था झाली आहे. ‘एक्स्पायरी’ झालेले औषध जसे काम करत नाही तसे काँग्रेसचे झाले आहे. तुम्ही लिहून ठेवा. आणखी किमान दोन निवडणुका मोदींच्या बाजूने आहेत. गांधी नावाचा करिष्मा ह्या ‘पप्पू’ने स्वतःच्या करणीने संपवला. प्रियांका याही फुसका बार निघाल्या. काँग्रेसला ह्या जीवघेण्या आजारातून उठवेल असा नेताच आज काँग्रेसकडे नाही. काँग्रेस कुठल्याही कामाचा उरला नाही. कुणाला निवडून आणू शकत नाही तो पक्ष काय कामाचा? मोदी काँग्रेसमुक्त भारत करू शकले नाहीत. राहुलबाबाने ते करून दाखवले.