राजकीय स्वार्थापोटी देशाला बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव पुन्हा उघड – चंद्रकांत पाटील

Maharashtra Today

मुंबई :- टूलकिट प्रकरणावरुन देशात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या टूलकिट प्रकरणावरुन काँग्रेसवर निशाणा साधत जोरदार टीका केली. काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करून मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रचाराची मोहीम आखल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेशी लढा देत असताना अशा प्रकारे देशाच्या विरोधात काम करणे निषेधार्ह आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

सोशल मीडियाच्या जगात ज्याला टूलकिट म्हणतात असे काँग्रेस पक्षाचे एक सूचनापत्र उघडकीस आले आहे. त्यामध्ये मोदी सरकारला (Modi Govt) बदनाम करुन अडचणीत आणण्यासाठी काय करावे याच्या सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राजकीय विरोधासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्यापर्यंत काँग्रेसने मजल मारली. संपूर्ण भारत कोरोनाशी लढण्यासाठी एकजूट झाला आहे आणि त्याचवेळी काँग्रेस केवळ राजकीय विरोधा साठी कोरोनाशी चाललेल्या लढाईत साथ न देता, देशात असंतोष निर्माण करण्यासाठी फेक आणि नकारात्मक बातम्या पसरवत आहे. हे कृत्य लांच्छनास्पद आहे. या सर्व प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या या टूलकिटमध्ये शतकानुशतकांपासून हिंदू समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक असणारा कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर असल्याची चर्चा करण्याची सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुपर स्प्रेडर कुंभ असा नॅरेटीव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असून तो आणखी वाढविण्यासाठी समविचारी आंतरराष्ट्रीय मीडिया व पत्रकारांशी हातमिळवणी करण्याची सूचना त्यामध्ये देण्यात आली आहे. ईदसाठी जमलेल्या गर्दीबाबत मात्र कोणतीही टिप्पणी करू नये, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचंही पाटील म्हणाले.

केवळ काँग्रेसचेच कार्यकर्ते कोरोना काळात जनतेला मदत करत आहेत असे भासवण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि व्हेंटिलेटर सारखी इतर सामुग्री अडवून ठेवावी आणि केवळ काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच ती उपलब्ध करून दिली जावी, अशी आणखी एक अमानूष सूचना या टूलकिटमध्ये आहे, असा आरोपही पाटील यांनी केलाय.

काँग्रेसच्या टूलकिट मधील धक्कादायक सूचनांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला ‘इंडियन स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ म्हटले जावे, अशी सूचना आहे. यासोबतच पीएम केअर फंडबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारे सातत्याने संभ्रम निर्माण केला जावा आणि जर एखाद्या सेलिब्रिटीने यामध्ये दान केले तर त्यांना सोशल मीडियावर टार्गेट करण्यात यावे, असेही सांगण्यात आलं. एकूणच हे टूलकिट धक्कादायक आहे. त्याची निर्मिती आणि वापर या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणांनी सखोल तपास करून कारवाई करावी. देशाची फाळणी आणि विरोधकांबद्दल गरळ ओकत राहणे यावर काँग्रेसने प्रभुत्व मिळवले आहे. भारत कोरोनाविरुद्ध लढत असतानाच काँग्रेसची सुरु असलेली कृष्णकृत्ये उघड झाली आहेत. काँग्रेसने दोषारोपांच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर येऊन देशहितासाठी उत्तम-उन्नत कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ही बातमी पण वाचा : आजही जिंकू आणि उद्या जरी निवडणुका घेतल्यास मोदी ४०० जागा जिंकतील; चंद्रकांत पाटलांना विश्वास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button