
नवी दिल्ली : कॉंग्रेसमध्ये (Congress) राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसने संघटनात्मक फेरबदलांना प्रारंभ केला. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्याचा महसूल मंत्रालयाचाही कारभार आहे. त्यांच्याऐवजी दुसरा प्रदेशाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे. कालच मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशात कमलनाथ यांच्याकडे विधिमंडळ काँग्रेस नेतेपदासह प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार आहे; तिथेही फेरबदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करून नंतर राष्ट्रीय अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड होण्याची शक्यता आहे. बदलाची ही प्रक्रिया जानेवारी महिन्यात पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे अ. भा. अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांचीच फेरनिवड होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी कालच ही जबाबदारी स्वीकारण्याचे संकेत दिलेत. दरम्यान, अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आसाम आणि केरळ या राज्यांसाठी तीन सेक्रेटरींचीही नियुक्ती केली आहे. या दोन राज्यांसाठी जे कॉंग्रेसचे प्रभारी नियुक्त आहेत त्यांना साहाय्य करण्याचे काम हे सेक्रेटरी करणार आहेत. सध्या आसामचे प्रभारी म्हणून जितेंद्रसिंह आणि केरळचे प्रभारी म्हणून तारिक अन्वर काम करत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला