काँग्रेसही उतरणार शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मध्ये

Congress

दिल्ली : काँग्रेसने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा दर्शवला असून ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली. खेडा म्हणाले, “८ तारखेला होणाऱ्या भारत बंदला पाठिंबा म्हणून काँग्रेस पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहे. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करू.

१० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी दिल्ली आणि एनसीआरमध्ये आंदोलनाला बसले आहेत. रविवारी सकाळपासूनच शेतकरी दिल्लीच्या सिंघु, टीकरी, दिल्ली गाजियाबाद, चिल्ला आणि इतर सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. शनिवारी पुन्हा सरकारसोबत चर्चा निष्फळ झाली. दिल्लीच्या सीमांवर असलेल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे.

शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांबाबत घेतलेल्या ३९ आक्षेपांवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर व केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी बाजू मांडली. मात्र, त्याच त्याच मुद्द्यांवर चर्चा करून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा आम्ही निघून जातो, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी बैठकीत घेतली. शेती हा राज्यांचा विषय आहे. शिवाय, पर्यायी बाजार आताही अनेक राज्यांमध्ये सुरू आहेत.

त्यामुळे शेतीमालाची विक्री-पणन व्यवस्थेमधील सुधारणांसाठी राज्य सरकारांशी शेतकरी चर्चा करतील. केंद्राने केलेले कायदे पूर्णत: शेतकरीविरोधी असून ते मागे घेतले गेले पाहिजेत, हा आग्रह शेतकरी नेत्यांनी धरला. ४० हून अधिक कामगार कायदे केंद्र सरकारने मागे घेतले तर शेती कायदे का घेता येत नाहीत, असा सवालही शेतकरी नेत्यांनी केला. त्यावर, अंतर्गत चर्चा करून प्रस्ताव मांडला जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केल्यामुळे शेतकरी नेत्यांनी बुधवारी पुन्हा चर्चा करण्यास सहमती दर्शवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER