‘काँग्रेसला डिवचणाऱ्या वाचाळवीर संजय राऊतांना आवरा’, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना इशारा

sanjay raut - balasaheb thorat - nana patole - Maharastra Today

मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात पोलीस दलापर्यंत पोहोचलेल्या धाग्यादोऱ्यांमुळे झालेली नाचक्की आणि कोरोना परिस्थिती हाताळताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या ठाकरे सरकारला आता काँग्रेसने आणखी एक इशारा दिला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीमधील तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याचा सूर शुक्रवारी काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत निघाला. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना स्पष्टपणे बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुतील एमसीए क्लबमध्ये शुक्रवारी काँग्रेस मंत्र्यांची बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत सचिन वाझे प्रकरणात काँग्रेसची नाहक बदनामी झाली. हे प्रकरण सरकारने व्यवस्थितपणे हाताळले नाही. त्यामुळे आमच्यावरही विनाकारण शिंतोडे उडाले, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी लावला. तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या लॉबिंगविषयीही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यूपीएचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याऐवजी शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी उचलून धरली आहे. या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. नाना पटोले यांनी आम्ही हा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडणार असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे आता शिवसेनेने संजय राऊत यांनी समज द्यावी, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वादाचा विषय निघाला. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे आघाडी सरकार आणि काहीही कारण नसताना काँग्रेसही बदनाम झाल्याचा मुद्दा काही मंत्र्यांनी मांडला. अनिल देशमुख यांची बाजू सावरण्यासाठी काँग्रेस नेते आघाडीवर राहिले, राष्ट्रवादीचे नेते फारसे पुढे आले नाहीत, आघाडी म्हणून एकजूट दिसली नाही, याकडे काही मंत्र्यांनी लक्ष वेधले. तसेच निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडील खात्यांना झुकते माप दिले जाते, याबद्दल बहुतांश मंत्र्यांनी तक्रारीचा सूर लावला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याला दुजोरा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला अधिकचा निधी दिला जातो, अशी तक्रार करण्यात आली.

ही बातमी पण वाचा : राज्यात लॉकडाऊनला विरोध ; काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली भूमिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button