थेट पाइपलाइनवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा

congress-BJP

कोल्हापूर : थेट पाईलपाईनच्या वक्तव्यावरून महापौर, उपमहापौर, महापालिकेतील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन बाबत माजी खासदारांना बोलण्याचा अधिकार काय? कोल्हापूरच्या जिव्हाळ्याची थेट पाईपलाईन योजना बारगळावी, म्हणून विविध सरकारी परवानग्यांत आडकाठी आणण्याऱ्या माजी पालकमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी माजी खासदारांनी ताकद लावली. त्यांनी आपल्या या पापाचे खापर इतरांवर फोडू नये, अशी टीका महापौर निलोफर आजरेकर व उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धनंजय महाडिक यांच्यावर पत्रकाद्वारे केली आहे.

थेट पाईपलाईन योजना नऊ वर्षे रेंगाळली आहे. ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती पूर्ण केली नाही, असे सांगत येत्या महापालिका निवणुकीत भाजपचा महापौर होईल तेव्हा थेट पाईपलाईनचा प्रश्न सोडवू, असे वक्तव्य माजी खासदार धनंजय महाडिक नुकतेच केले होते. त्याला महापालिकेतील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकातून प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, माजी खासदारांनी ही बतावणी केली आहे. खासदारकीच्या काळात सोयीनुसार केलेले राजकारण व रायकीय फायद्याने मारलेल्या कोलांटउड्या याचा परिपाक म्हणून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना जनतेने नाकारले. माजी खासदारांनी त्यांच्या कार्यकाळात प्रकल्पास किती भेटी दिल्या,किती बैठका घेतल्या, संसदेत किती प्रश्न उपस्थित केले,;योजनेशी संबंधित सरकारी पातळीवर परवानग्या मिळवून देण्यात खासदार म्हणून किती प्रयत्न केले, याची कागदोपत्री माहिती जाहीर करावी, असे आव्हानही पत्रकातून देण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनीही पत्रकाद्वारे धनंजय महाडिक यांच्यावर पत्रकाद्वारे टीका केली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिकेत सत्ता येण्याचे स्वप्न पाहणे बंद करावे. त्यांनी फसवाफसवीचा धंदा बंद करावा. राज्यात भाजपची सत्ता असताना शहरासाठी किती निधी दिला याचा त्यांनी हिशेब द्यावा, असा हल्लाबोल पोवार यांनी पत्रकातून केला आहे. राज्यात सत्ता असताना पाच वर्षे भाजपने महापालिकेत सत्ता नाही म्हणून निधी दिला नाही. तसेच थेट पाईपलाईन योजना रखडण्यासाठी वजन खर्च केले. महापालिकेत सत्ता आणणार म्हणत असलात तरी प्रथम ताराराणीच्या नेत्याला विचारून बघा. तो बास्केट ब्रिज कोठे बांधला हे त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आता सांभाळून बोलावे, असे पत्रकात म्हटले आहे.