‘हा तर काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा डाव’, काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र

मुंबई :- मुंबई काँग्रेसचे महासचिव आणि माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विश्वबंधू राय (Vishwabandhu Rai) यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा डाव आखात आहे, अशी तक्रार राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही-९ मराठीने दिले आहे.

विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून मांडलेले सात मुद्दे

  • महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण या वर्षभरात केवळ मित्रपक्ष म्हणूनच काँग्रेसचं महाआघाडीत स्थान राहिलं आहे.
  • केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच राज्य सरकार चालवत असल्याचं चित्रं आहे. एनसीपी सातत्याने काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
  • काँग्रेसचे मंत्री संघटनेच्या काहीच उपयोगी पडताना दिसत नाहीत. सामान्य जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांना तर काँग्रेसच्या मंत्र्यांची खातीच माहिती नाही.
  • आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले तरी महामंडळं आणि आयोगांवरील नियुक्त्या अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.
  • काँग्रेसचं नुकसान करण्यावर आणि स्वत:चा पक्ष बळकट करण्यावर मित्रपक्षांनी जोर दिला आहे. मित्रपक्षांचा हा डाव रोखण्यात काँग्रेसला अपयश येत आहे.
  • २०१९ मध्ये पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्ती झालेली नाही. सरकारला एक वर्ष पूर्ण झालं तरी आमचीही आश्वासनं  अद्यापही तशीच आहेत.

काँग्रेसची व्होट बँक स्वत:कडे खेचण्यावर मित्रपक्षांनी भर दिला असून त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. पक्षातून होणारी गळती रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची गरज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला आघाडीच्या धर्माची आठवण करून देण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER