भाजपाला बहुमतापासून रोखण्यासाठी कॉंग्रेस- तृणमूलचा छुपा समझोता?

Maharashtra Today

पश्चिम बंगालच्या निवडणूकांमध्ये (West Bengal elections) शेवटच्या दोन टप्प्याचं मतदान बाकी बाकी आहे. २६ आणि २९ एप्रिलला पश्चिम बंगालमधील शेवटच्या दोन टप्प्यातलं मतदान पार पडून २ मे ला निकाल जाहीर होणार आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण क्षेत्रातलं मतदान बाकी आहे. या भागातील बहूतांश मतदार संघ मुस्लीम बहूल असून सत्ताधाऱ्यांच्या पारड्यातच मतं या मतदार संघातले मुस्लीम टाकत असतात. मग ते तृणमुल असो की डावे. यंदाच्या निवडणूकीत मात्र ममतांना ही मत जिंकण्यात मोठी कसरत करावी लागते आहे.

कोरोनाची (Corona) दुसरी लाट या दरम्यान देशभरात मोठा विध्वंस माजवते आहे. अशा परिस्थीत कोरोनाचं कारण देत कॉंग्रेसनं पश्चिम बंगाल निवडणूकीतून काढता पाय घेतल्याचं चित्र आहे. कोरोनाचं कारण देत कॉंग्रेसनं (Congress) प्रचार सभा आणि रॅली घेणं टाळलंय. यातून कॉंग्रेसला कोरोना प्रसार रोखण्याचा संदेश द्यायचा असला तरी तृणमूल (TMC) आणि कॉंग्रेसचा आतून ‘समझोता’ झाल्याचं राजकीय विश्लेष्कांचं आणि स्थानिकांच म्हणनं आहे.

मुस्लीम मतं ममतांच्या पारड्यात पडावीत म्हणून

बंगालमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणिय आहे. पश्चिम बंगालच्या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे ३०टक्के मुस्लीम मतदान असल्याचं आकडेवारी सांगते. या मतदारारांच्या भरवशावरच सत्तेची चावी हाती येते हे कॉंग्रेस, भाजप (BJP) आणि तृणमूललाही माहिती आहे. त्यामुळं इतक्या मोठ्या संखेतल्या मतदारांकडे दुर्लक्ष करणं ममता दिदींना परवडणारं नाही, शिवाय हैद्राबादचे खासदार आणि ‘एम. आय. एम.’चे खासदार असद्दुदीन ओवीसी यांनी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमुल कॉंग्रेसला आव्हान देत मुस्लीम मतदारांना स्वतःकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.

पश्चिम बंगालच्या दक्षिण भागातील मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे. बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात ६६. ८८ टक्के मुस्लीम मतदान आहे. माल्दा जिल्ह्यात ५२ टक्के मुस्लीम मतदार आहेत. उत्तर दिनाजपुरमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या ४९.९२ टक्के आहे. बिरभुम जिल्ह्यात मुस्लीम मतं ३७.०६ टक्के आहेत. या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदार संघात प्रचार करताना प्रत्येक रॅली आणि प्रचार सभेत ममता म्हणत होत्या. “मुस्लीमांच्या एकत्रित मतदानाची तृणमुलला गरज आहे. मुस्लीम मतांची विभागणी भाजपसाठी फायद्यची ठरु शकते. “

इमामांचं मन वळवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न

बंगालमध्ये मुस्लीम मत इतक्या मोठ्या प्रमाणात असले तरी त्यामध्ये अंतर्गत विभागणी आहे. केवळ भाषिकतेच्या मुद्द्यावरुन बंग्लादेश पाकिस्तानापासून वेगळा झाला होता. यावरुन तिकडच्या लोकांची ‘बंगाली अस्मिता’ किती तीव्र आहे हे समजते; पश्चिम बंगालच्या मुस्लीमांमध्ये बांग्ला अस्मिता असली तरी बिहार, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील हिंदी भाषिक मुस्लीमांची संख्या तिथं मोठी आहे. या दोन्ही मुस्लीम मतांना स्वतःकडे वळवण्यासाठी मतदार संघातील इमामांची मर्जी सर्वच राजकीय पक्षांना सांभाळावी लागते. यात कॉंग्रेस अग्रेसर आहे. कॉंग्रेसच्या मागच्या वेळी निवडूण आलेल्या ४४ जागा ह्या मुस्लीम बहुल क्षेत्रातूनच निवडूण आल्यात. कोरोनाचं कारण देत निवडणूकीतून शेवटच्या टप्प्यात काढता पाय घेणारी कॉंग्रेस संपुर्ण मुस्लीम मतदान ममतांच्या ‘तृणमुल कॉंग्रेस’च्या पदरात पडावं याची दक्षात घेत असल्याचं बोललं जातंय.

अब्बास सिद्दीकींचंही मोठं आव्हान

पश्चिम बंगालचा स्थानिक पक्ष ‘भारतीय धर्मनिरपेक्ष आघाडी’ (आय. एस. एफ.) चे अब्बास सिद्दीकी यांचा मुस्लीम आणि मागासवर्गीय हिंदू मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्यात यश मिळवलंय. मुस्लीम बहूल भागनगरमध्ये या पक्षानं चांगलं वर्चस्व निर्माण केलंय. अशा परिस्थीती ममतांना तृणमुलच्या पारंपारिक मतदारासोबत कॉंग्रेसवर विश्वास ठेवणाऱ्या मुस्लीम आणि हिंदू-मागासवर्गीय मतांची गरज आहे. त्यामुळं कॉंग्रेसनं प्रचारातून माघार घेत ममतांना एक प्रकारची मदतच केल्याचं बोललं जातंय.

२०१९ लोकसभा निवडणूकीनंतर ममतांचा ‘प्रो मुस्लीम चेहरा’

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ममतांना मोठा फटका बसला. २०१४ ला मोदी लाट असतानासुद्धा भाजपला फक्त दोनच लोकसभेच्या जागा जिंकता आल्या होत्या. ममतांच्या तृणमुलनं ४१ पैकी ३४ जागा स्वतःकडे राखल्या. २०१९ ला भाजपनं मुसंडी मारत ४२ पैकी १८ जागा जिंकल्या. ममतांसाठी हा मोठा धक्का होता. यानंतर ममतांनी रणनिती बदलत पुन्हा स्वतःला मुस्लीमांच्या बाजूचं नेतृत्त्व असल्याचं सिद्ध करण्यासाठी नव्या रणनितीला सुरुवात केली होती.
भाजपाला रोखण्यासाठी आतून कॅाग्रेस आणि
तृणमूल प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचं सध्यातरी चित्र आहे.

भाजपला बहुतमता रोखण्यासाठी छुपा समझोता?

निवडणूकीच्या सुरूवातीच्या टप्यातील मतदानात भाजप लिड घेईल अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी, सामान्य जनतेने व्यक्त केलीये. भाजपा १०० च्या पुढे जागा मिळवेल असेही अंदाज बांधले गेलेत. त्यामुळे याचा धसकी घेत,उरलेल्या दोन टप्प्यातील मुस्लीम बहुल मतदार संघातील मतदानावर जोर देण्यासाठी तृणमूल आणि कॉंग्रेसने साटंलोटं केल्याचं बोललं जातंय.

निवडणूकीच्या सुरुवातील तृणमुल कॉंग्रेस आणि राष्ट्रीय कॉंग्रेस एकत्र लढतील अशी शक्यता होती. “भाजपला रोखण्यासाठी समर्थन देऊन तृणमुलचे हात बळकट करा.” असं आवाहन ममतांनी डाव्यांना आणि कॉंग्रेससा केलं होतं पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांनी यावर टोकाची भूमिका घेतली होती, राज्यात कॉंग्रेस संपली तरी चालेल पण तृणमुलला साथ देणार नाही असं ते म्हणाले होते. मात्र निवडणूक शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर कॉंग्रेसनं ममतांना छुपा पाठिंबा जाहीर केलाय, असं राजकीय विश्लेषकांच मत आहे. यामुळं ममतांना किती फायदा होईल. कॉंग्रेसचं नुकसान होईल का? भाजपला रोखण्यात कॉंग्रेसचा हा कथीत छुपा डाव यशस्वी होईल काय? या प्रश्नांची उत्तर मतपेटीत कैद आहेत. येत्या २ मे ला याबद्दलच स्पष्ट चित्र आपल्या समोर येईल.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button