काँग्रेसच्या हातून यूपीएचं अध्यक्षपद जाणार? अनेक पक्ष शरद पवारांच्या बाजूने

Sharad Pawar Maharashtra Today

नवी दिल्ली :- मागील काही दिवसांपासून संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनेकडून तर जाहीरपणे ही मागणी करण्यात आली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसच्या हातून यूपीएचं अध्यक्षपद जाणार का? यूपीएचं अध्यक्षपद हातून गेल्यास त्याचा थेट गांधी घराण्याच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होणार का? असा सवालही केला जात आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांना मजबूत करण्यासाठी शरद पवारांकडे (Sharad Pawar) युपीएच अध्यक्षपद देण्यात यावे असा मतप्रवाह अनेक पक्षांचा आहे.

गेल्या काही दिवसांपासून गांधी कुटुंबाच्या विरोधात काँग्रेसमधील एक गटच सक्रिय झाला आहे. बहुतेक ज्येष्ठ नेत्यांनी गांधी कुटुंबावर उघड टीका केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर हा विरोध अधिक वाढताना दिसणार असल्याचं सांगितलं जातं. येत्या जूनमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. परंतु काँग्रेसच्या 23 नेत्यांनी थेट गांधी कुटुंबालाच आव्हान दिल्याने यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता कमी असल्याचं दिसून येत आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता असून गांधी घराण्यातील उमेदवाराला विजयासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे काँग्रेस पक्षाबाबत लोकांच्या मनात असलेली ओढ कमी होताना दिसून येत आहे. ची दिवसे न दिवस लोकप्रियता कमी होत आहे. त्याचा परिणाम केवळ पक्षावरच होत नसून यूपीएवरही होताना दिसत आहे. यूपीएमध्ये सध्या 11 पक्ष आहेत. त्यात नऊ प्रादेशिक पक्षांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन राष्ट्रीय पक्षांचा समावेश आहे. शिवसेनेलाही यूपीएचा हिस्सा मानलं जाऊ शकतं. शिवसेना औपचारिकपणे यूपीएमध्ये सहभागी झालेली नाही. त्यातच आता यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यूपीएमध्ये राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. यूपीएमध्ये प्राण फुंकण्याची क्षमता केवळ शरद पवारांमध्येच आहे. पवारांना दीर्घ राजकीय अनुभव आहे.

सर्व पक्षांमध्ये त्यांचे सलोख्याचे संबंध असून त्यांच्या शब्दाला राजकीय वर्तुळात किंमत आहे. त्यामुळे पवारांकडे यूपीएचं नेतृत्व देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. एनडीएचे मित्र पक्ष भाजपवर नाराज आहेत. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए आणि यूपीएचा भाग नाहीत. अशा वेळी पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवल्यास हे सर्व प्रादेशिक पक्ष यूपीएमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे 2024च्या लोकसभआ निवडणुकीत भाजप विरोधात सशक्त पर्याय उभा राहू शकतो, त्यामुळेच पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावं असं वाटणारा एक मतप्रवाह निर्माण झाला आहे.

ही बातमी पण वाचा : पंढरपूर पोटनिवडणूक : पवारांचे धक्कातंत्र, थेट या नेत्याला केली लढण्यासाठी विचारणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER