गृहमंत्र्यांच्या नागपुरात राष्ट्रवादीचा गेम

Sunil Kedar-Anil Deshmukh

badgeनागपूर जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेत काँग्रेसने राष्ट्रवादीला धक्का दिल्याने खळबळ आहे. निवडणुकीत दोन काँग्रेसची आघाडी असतानाही पदाधिकारी निवडताना काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेपासून बाजूला ठेवले. मंत्री काँग्रेसचे सुनील केदार यांनी राज्याचे गृहमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचा गेम केल्याने राजकारण तापले आहे. उपराजधानीच्या जिल्ह्यात दोन मंत्री आमनेसामने उभे झाल्याने महाआघाडीची महाबिघाडी झाल्याचे चित्र आहे.

मागील टर्ममध्ये नागपूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात होती. यावेळीही बदललेल्या सत्ता समीकरणात जिल्हा परिषद भाजपच्या हातून गेली. ५८ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसला एकहाती बहुमत मिळाले. काँग्रेसला ३०, राष्ट्रवादीला ११ तर भाजपला १५ जागांवर विजय मिळाला. आघाडी असल्याने किमान उपाध्यक्षपद मिळेल अशी राष्ट्रवादीला अपेक्षा होती. त्यासाठी अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल हे दिग्गज नागपुरात तळ देऊन होते. पण जिल्हा परिषदेचे राजकारण खेळवत आलेले मंत्री सुनील केदार यांनी राष्ट्रवादीला भीक घातली नाही. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे उपाध्यक्षपदाकरिता इच्छुक होते. मुलाला खुर्ची देऊ शकलो नाही म्हणून अनिलबाबू संतप्त आहेत. दिल्लीपर्यंत हा मामला नेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पुढच्या आठवड्यात चार सभापतींची निवडणूक आहे.

आदित्य ठाकरेंच्या ‘मुंबई नाईट लाईफला’ गृहमंत्र्यांचा धक्का

त्यात किमान दोन सभापती मिळाले नाहीत तर ह्या दोन नेत्यांमधील आणखी संघर्ष भडकू शकतो. राष्ट्रवादीला काही द्यायचे नाही हा निर्णय कुणाचा? असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. सुनील केदार यांचे राजकारण ‘मोदी पद्धती’चे आहे. स्वतःचा गट ते चालवतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे. महाआघाडी सुरळीत चालायची असेल तर समन्वय समितीमार्फत महत्त्वाचे निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा दबंग मंत्र्याला, मग तो कोणत्याही काँग्रेसचा असो, आवरणे अवघड होईल.

नागपूर जिल्हा परिषदेतले वातावरण थोड्याफार फरकाने राज्यातल्या इतर जिल्हा परिषदांमध्येही आहे. महाआघाडी कागदावर असून गटातटाचे राजकारण उसळी मारत आहे. आघाडीच्या सरकारमध्येही वेगळे चित्र नाही. चार-पाच मुख्यमंत्री आहेत की काय, असा प्रश्न मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून पडतो. राज्यात जे दिसते तेच जिल्ह्याजिल्ह्यांत चालू आहे. भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याने हे असे प्रसंग वेळोवेळी येणार आहेत. मात्र वाद असले तरी सरकारला धोका नाही; कारण सत्ता सर्वांना प्रिय आहे.