औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्याला काँग्रेसचा ठाम विरोध – बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

औरंगाबाद :- औरंगाबादचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ करण्याच्या हालचाली सुरू आहेत असे वृत्त काही माध्यमांमध्ये आल्यानंतर या प्रश्नाच्या उत्तरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणालेत, या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

 या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामांतर करून ‘संभाजीनगर’ नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या पाच वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. या नावबदलाबाबत हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. शिवसेना नेते औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असा करतात. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ केला होता.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही त्यांच्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ केला होता. त्यामुळे सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करून संभाजीनगर नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याची चर्चा होती. याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बाळासाहेब थोरात म्हणालेत, महाविकास आघाडीत काँग्रेस घटक पक्ष आहे; पण नामांतराला आमचा विरोध राहील. महाविकास आघाडीमध्ये ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ ठरलेला आहे.

त्यामुळे औरंगाबादच्या नावाचा प्रस्ताव येईल, त्याला आमचा विरोध राहील. अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर आला नाही. राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलो आहे. त्या शपथेची प्रतारणा होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) त्याच आधारावर निर्माण झालेली आहे. आमच्याजवळ सामाजिक मतभेदाला स्थान नाही. आमचा ‘संभाजीनगर’ या नामांतरणाला विरोध राहील, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितले.

आम्ही करू – मनसे
शिवसेना हा पक्ष गेल्या वेळी केंद्रात आणि राज्यातही सत्तेत होता. तरीही औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे यासाठी त्यांनी आवाज उठवला नाही. याबाबत शिवसेनेने फक्त राजकारण केले आहे. आता लोकांना याबाबत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नाही. आता आम्ही यासाठी पुढाकार घेणार असून राज्य सरकारला औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडू, असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER