राहुल आणि सोनिया गांधी यांना हात लावला तर जनता रस्त्यावर येईल : अशोक चव्हाण

Ashok Chavan

वाशीम :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल आणि सोनिया गांधी यांना अनुसरून ‘कसे वाचता ते बघतोच’ अशा प्रकारचे विधान केले होते . ही भाषा पंतप्रधानांना शोभणारी नसून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात लावला तर देशातील जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेनिमित्त महेश भवन येथे आयोजित सभेत दिला.

ही बातमी पण वाचा : नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल-सोनियांना दिलासा नाही

जनतेने जोपर्यंत आम्हाला सन्मानाने पदावर बसविले तोपर्यंत आम्ही बसलो; आणि नंतर जनतेत गेलो, पण अशी भाषा कधीच केली नाही. देशाचे पंतप्रधान जाहीरपणे धमक्या देतात . अशा सरकारला आपल्याला राज्यात आणि केंद्रात पुन्हा निवडून द्यायचे काय? याचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. देशात सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही सुरु आहे . हे सरकार पुन्हा पाच वर्षांसाठी निवडून दिल्यास पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत. या देशात लोकशाही जिवंत राहणार नाही, असेही चव्हाण म्हणाले . ११ डिसेंबर रोजी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यात आणि देशात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतील. १५ फेब्रुवारीला आचारसंहिताही लागेल. या आगामी निवडणुकांसाठी आम्ही सज्ज असून सत्तधारी सरकारला चांगलाच धडा शकवू असेही ते म्हणाले .

दरम्यान त्यांनी अयोध्यातील राम मंदिरावर भाष्य केले . ‘मागील २० ते २२ वर्षांपासून आयोध्येमध्ये राममंदिर बांधण्याचा मुद्दा समोर आणल्या जात आहे. पण आजपर्यंत राममंदिर बनले नाही. रामाचे नाव आले की निवडणुका आल्या, असे आता जनता समजू लागली आहे. रामाच्या नावावर जातीभेदभाव पसरविण्याचे काम भाजपा, आरएसएस आणि जनसंघ करीत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करणाऱ्या सरकारने आतापर्यंत फक्त १२ हजार कोटी दिले आहेत. आजपर्यंत ११ हजार ७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही दुर्दैवाची बाबा आहे .

ही बातमी पण वाचा : देशात शेतीची बिकट अवस्था असण्याला पहिले पंतप्रधान नेहरु जबाबदार : मोदी

एकेकाळी उद्योग गुंतवणूक आणि कृषी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर राहणारे राज्य आज गुन्हे आणि शेतकरी आत्महत्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे’, अशी टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली. या सभेत माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, आमदार वजाहत मिर्झा, आमदार हरिभाऊ राठोड, श्याम उमाळकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीप सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.