धुळ्यात काँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार : राहुल गांधींची सभा

Rahul Gandhi

धुळे : लोकसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसही कामाला लागली असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी येत्या 1 मार्च रोजी धुळ्यात प्रचारसभा घेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असून धुळयाताली सभेत काँग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करेल. तसे आदेशही नेते आणि कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढली जाणारी लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडे देखील सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

धुळ्यात दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंदर मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी पंतप्रधानांच्या सभेला मोठा जनसमुदाय हजर होता. आता त्याच धुळ्यातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडतील. धुळे हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला पराभूत केले होते. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे.