पुणे पालिकेत रंगलाय कॉँग्रेस शिवसेना सामना

Pune Municipal Corporation - Congress - Shiv Sena - Editorial

Shailendra Paranjapeराज्याच्या राजकारणात शिवसेना (Shiv Sena) कॉँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) यांचे आघाडी सरकार सत्तेवर आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होऊ शकले आहेत आणि आपल्या वडिलांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना दिलेला शब्द पुरा करू शकले आहेत. भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्वाधिक १०५ आमदार निवडून आणल्यानंतरही त्यांना सत्तेबाहेर ठेवण्याचे सारे श्रेय अर्थातच या आघाडी सरकारचे कर्ते धर्ते आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आहे. शिवसेनेने हात दिला की मनसे टाळी वाजवायची नाही आणि सदू-दादूच्या गोष्टीत कायम मनमुटाव व्हायचा. पण इथे उद्धव ठाकरे यांनी हात पुढे करण्याआधीच पवारसाहेबांनी टाळी दिलेली होती. त्यामुळे कळीचा मुद्दा कॉँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष प्रादेशिक आणि मराठी अस्मिता जोपासणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर जाईल काय, हा होता.

भारतीय जनता पक्ष आणि कॉँग्रेस हे राष्ट्रीय पातळीवरचे तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शिवसेना हे तशा अर्थाने प्रादेशिक पक्ष आहेत. पवारसाहेबांचे नेतृत्व हे राष्ट्री नेतृत्व आहे आणि केंद्रात नरेन्द्र मोदी (Narendra Modi) यांनी दुसऱ्यांदा करिष्मा दाखवल्याने पवारसाहेबांना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणापासून भल्या पहाटेच्या शपथविधीपर्यंत सर्व ठिकाणी लक्ष घालावं लागतं. पण ती राजकी मजबुरी असते. यशासारखी दुसरी गोष्ट नाही आणि अपयश हे नेहमी अनाथच असते, अशा अर्थाचं इंग्रजी वचन आहे. तेच महाराष्ट्रात घडलंय.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे एकीकडे राज्य पातळीवर कॉँग्रेस काहीशी दुर्लक्षित असल्याची भावना आहे आणि त्यां कारणही स्वाभाविक आहे. कोणत्याही विषयात शरद पवारसाहेब काय भूमिका घेतात, हेच महत्त्वाचे असते. अधून मधून उद्धव ठाकरे मीच मुख्यमंत्री आहे, हे दाखवून देत असतात. कधी ते माझ्या हातात स्टिअरिंग आहे आणि तुम्ही नुसते गाडीतले प्रवासी आहात, असंही सांगताना दिसतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारचे खरे चालक कोण आहेत आणि कोण नुसते प्रवासी आहेत की या गाडीलाच पवारसाहेबांचा रिमोट आहे, हे कालांतराने कळेलच पण सध्या तरी कॉँग्रेसमधे सारं काही आलबेल नाही, हे दिसून येतंय.

पुण्यामधे महापालिकेत (Pune Municipal Corporation) भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिघेही विरोधी पक्षात आहेत. असं असूनही पुण्यामधे कॉँग्रेस आणि सिवसेना परस्परांना भिडलेले दिसतात. त्याला कारण घडलंय ते कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि नुकतेच पालिकेतल्या गटनेतेपदावरून दूर झालेले अरविंद शिन्दे यांनी थेट राज्य सरकारच्या निर्णयावरून थेट शिवसेनेवरच टीका केलीय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला राज्य सरकारने करोनाच्या फैलावामुळे परवानगी नाकारली आणि सर्वच सभा बैठका ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे सांगितले आहे. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी तर टीका केलीच आहे पण अरविंद शिन्दे यांनी शिवसेनेला बोचेल अशी टीका केलीय.

मंत्रिमंडळाची बैठक होते तर पालिकेची सर्वसाधारण सभा का नाही होऊ शकत, असा प्रश्न महापौर मोहोळ यांनी विचारला तर शिन्दे यांनी थेट शिवसेनेच्या वर्मावरच घाला घातलाय. मुंबई महापालिकेतले भ्रष्टाचार समोर येतील म्हणून महापालिकांच्या सर्वसाधारण सभांना राज्य सरकार परवानगी नाकारत आहे का, असा प्रश्न शिन्दे यांनी विचारलाय. या प्रश्नामुळे अर्थातच पुण्यापुरतेच नाही तर मुंबई पातळीवर धक्के पोहोचले आहेत. कॉँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत अरविंद शिन्दे यांना यासंदर्भात विचारणा केल्याचे ऐकिवात नाही पण शिवसेनेच्या पुण्यातल्या नेत्यांनी मात्र खवळून प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि पालिकेतले गटनेता पृथ्वीराज सुतार यांनी शिन्दे यांच्यावर टीका केलीय. शिन्दे यांचे गडनेतापद काढून घेतलेले असल्याने ते पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेण्यासाठी असले आरोप करत आहेत. वास्तविक शिवसेना २५ वर्षे मुंबईत सत्तेवर आहे, याकडेही मोरे आणि सुतार यांनी लक्ष वेधले आहे.

शिन्दे यांच्या आरोपामुळे राज्य पातळीवर किंवा मुंबईत फार काही फरक पडणार नाही पण कदाचित मुंबई पालिकेच्या सभेत शिन्दे यांचे नाव भाजपाकडूनही शिवसेनेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात घेतले जाईल. त्यापेक्षा फार मोठी खळबळ माजेल असे नाही. पण तरीही एक वर्षावर पालिकेच्या निवडणुका असताना आणि संजय राऊत एकत्रित निवडणुका लढवण्याचे संकेत देत असताना शिन्दे यांचे विधान भारतीय जनता पक्षाला दिलासा देणारे आहे. त्याबरोबरच ऑल इज नॉट वेल विदिन अपोझिशन इन पुणे, हेही समोर आले आहे. लवकरच काय ते समजेल कारण घोडा मैदान जवळ आहे.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER