शिवसेनाप्रमुखांना नमन करत भाई जगताप म्हणाले, स्वबळावर निवडणूक लढण्यास काँग्रेसची तयारी

Balasaheb Thackeray-Bhai Jagtap

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर सर्वच्या सर्व 227 जागांवर लढण्यासाठी सज्ज आहे, असे विधान मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केले. भाई जगताप यांनी शुक्रवारी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेत बाळासाहेबांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब यांच्या सर्व स्मृतिदिनाला मी नेहमी आवर्जून येत असतो. राजकारणाच्या पलिकडे काही व्यक्तींचं स्थान असतं, इथे मला प्रेरणा मिळत असते. आज आणि उद्या सर्व महान व्यक्तींच्या प्रेरणा स्थळावर जाणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भात चाचपणी झाल्याची चर्चा होती. मात्र, आता भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार बोलून दाखवला आहे.

यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षण हा भावनिक आणि गुंतागुंतीचा विषय आहे. आरक्षण देण्याचं काम महाविकास आघाडीने केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील समाजात या मुद्द्यावरुन तेढ निर्माण करु नये, अशी माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. आज शेतकरी आंदोलनाचा 29 वा दिवस आहे. आतापर्यंत 25 पेक्षा अधिक शेतकरी आंदोलनात शहीद झाले. महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना शेतकऱ्यांचा संप झाला, राज्यात पूर आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी केवळ हवाई पाहणी केली. त्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे वाटप झाले नाही, असा आरोप भाई जगताप यांनी केला.

विमा कंपन्या केंद्र सरकारने ठरवल्या असल्याने त्याबाबत त्यांनी बोलू नये. फडणवीस यांची केविलवाणी स्थिती झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी जाहीर केले त्यातील साडेसात कोटी रुपये वर्ग झाल्याचा दावा भाई जगताप यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER